Rohit Sharma Viral Video: रोहित शर्मा हा भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो बाप्पाचं दर्शन घेताना दिसून येत आहे. रोहितने वरळीतील मुंबई पोलिसांचा राजा या गणपती मंडळाला भेट देऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्याची कार जायला देखील जागा नव्हती.

मुंबईकर रोहित शर्मा जेव्हा मैदानावर उतरतो. तेव्हा मैदानात उपस्थित असलेले हजारो क्रिकेट चाहते ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’अशी घोषणा करतात. यावेळी तो स्वत: मुंबई पोलिसांच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी आला. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आणि ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’अशा घोषणा दिल्या.

रोहितला पाहण्यासाठी हजारो चाहते तिथे उपस्थित होते. त्यामुळे त्याची कार जायला देखील जागा नव्हती. त्यामुळे रोहितने स्वत: कारचं सनरूफ उघडलं आणि चाहत्यांना बाजूला करताना दिसून आला. रोहितचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला. कारण साधारणपणे कुठलाही क्रिकेटपटू किंवा सेलिब्रिटी गर्दीत कारमधून बाहेर येणं टाळतो. मात्र, रोहित आपल्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. रोहितनंतर ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे.

मैदानावर केव्हा पुनरागमन करणार?

रोहितने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा पुनरागमन करताना दिसून येऊ शकतो. दरम्यान रोहित आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळून निवृत्ती जाहीर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर काही वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर वनडे क्रिकेटला रामराम करू शकतो. पण रोहितने फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, त्याने २०२७ वर्ल्डकपसाठी तयारी सुरू केली आहे.