भारतीय वनडे संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. सध्या तो रिहॅब प्रक्रियेसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे शिबिरही बंगळुरू येथे सुरू आहे. रोहितने या संघातील खेळाडूंना ‘गुरुज्ञान’ दिले. त्याचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये रोहित भारतीय अंडर-१९ संघातील खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहे. या संघाला २३ डिसेंबरपासून यूएईमध्ये आशिया कप खेळायचा आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी २०१८ मध्ये आपल्या प्रशिक्षणात १९ वर्षांखालील संघाला विश्वविजेता बनवले होते. “भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या रिहॅब दरम्यान आशिया कपसाठी तयारी करणाऱ्या अंडर-१९ संघातील खेळाडूंशी बोलत आहे”, असे कॅप्शन बीसीसीआयने या फोटोंना दिले आहे.

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला गेल्या आठवड्यात भारतीय वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. यासोबतच अजिंक्य रहाणेच्या जागी त्याला कसोटी संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची कसोटी उपकर्णधार म्हणून पहिली कसोटी ठरली असती. पण हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर पडला. तीन ते चार आठवड्यांत तो बरा होण्याची अपेक्षा आहे. रोहितच्या जागी भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO : हसून हसून दुखेल पोट..! विराटनं घातला इशांतच्या बॅगेत हात अन् मिळालं…!

रोहितप्रमाणेच रवींद्र जडेजाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. जडेजाची दुखापत बरी होण्यासाठी काही महिने लागू शकतात. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, तर तो आयपीएल २०२२ च्या आसपासच बरा होऊ शकेल. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेदरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळू शकला नाही.