Rohit Sharma Shivaji Park Practice Video: रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जोमाने तयारी करत आहे. ३७वर्षीय रोहितने या दौऱ्यापूर्वी तब्बल १० किलो वजन कमी केलं असून नव्या लूकमध्ये हिटमॅनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रोहितने त्याचा डाएट बदलत, जिममध्ये घाम गाळत आणि रनिंग करत आपला फिटनेस टिकवला आहे. याशिवाय रोहित शर्मा आता मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात सराव करतानाचे व्हीडिओ समोर आले आहेत.
रोहित आणि विराट कोहलीची जोडी तब्बल ६ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी या दोन्ही दिग्गज खेळाडूंची भारतीय वनडे संघात निवड झाली आहे. पण भारताच्या वनडे संघाची कमान मात्र आता शुबमन गिलकडे देण्यात आली आहे. त्यामुळे रोहितसह विराटलाही वनडे संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
भारताच्या कसोटी सामन्यापेक्षाही रोहितची फलंदाजी पाहायला चाहत्यांची गर्दी
रोहित शर्माने यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रोहित शर्मा आज शिवाजी पार्कमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. यादरम्यान रोहित मोठमोठे फटके मारतानाही दिसत आहे. रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांनीही उपस्थिती लावली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी फारशी हजेरी लावलेली नाही, स्टेडियम बऱ्यापैकी रिकामं दिसत आहे. त्यापेक्षाही सर्वाधिक चाहत्यांनी रोहितला पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये हजेरी लावली आहे.
२०२७ च्या वर्ल्डकपचा विचार करता दोन्ही खेळाडूंना जर भारतीय संघात आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर राष्ट्रीय कर्तव्यावर नसतान देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार आहे, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. फारसे आंतरराष्ट्रीय वनडे सामने होणार नसल्याने मॅच प्रॅक्टिससाठी आणि फॉर्मसाठी रोहित-विराट विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचं आता रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे.
रोहित-विराट विजय हजारे ट्रॉफी खेळणार?
विराट कोहली जवळजवळ १८ वर्षांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने २०१० मध्ये दिल्लीसाठी शेवटचा लिस्ट ए सामना खेळला होता. तर रोहित शर्मा सात वर्षांच्या विश्रांतीनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करेल. २०१८ मध्ये रोहित शर्मा अखेरचा सामना खेळला होता.
२५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, भारतीय संघ ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर वनडे मालिका खेळेल. यानंतर थेट जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळवली जाणार आहे. तर विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात मुंबईच्या होणाऱ्या सहा सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये रोहित खेळण्याची शक्यता आहे.