Rohit Sharma Stand at Wankhede: आयपीएल २०२५ सुरू असताना काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती की, वानखेडे स्टेडियममधील एक स्टॅन्डला रोहित शर्माचं नाव देण्याचा प्रस्ताव एमसीए समोर ठेवण्यात आला होता. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने बैठकित याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता वानखेडे स्टेडियममधील एका स्टॅन्डला रोहित शर्माचं नाव देण्यात आलं आहे.

वानखेडे स्टेडियममधील एका स्टॅन्डला रोहित शर्माचं नाव देण्याबाबत एमसीएने हिरवा कंदील दिला आहे. वानखेडे स्टेडियमच्या स्टँड्सना रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांची नावे देण्यात आली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी वानखेडे स्टेडियमच्या तीन स्टँडची नावे बदलली.

एका वर्षाच्या आत भारताला टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही जेतेपद मिळवून देण्याच्या असाधारण कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माचं स्टॅन्डला नाव देण्याची मागणी समोर आली. आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याने प्रचंड यश मिळवले आहे, त्याने फ्रँचायझीला विक्रमी पाच आयपीएल जेतेपद मिळवून दिली आहेत. रोहित जेव्हा जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा वानखेडे स्टँडमधून “मुंबईचा राजा” चे जयघोष वारंवार ऐकू येतात. आता रोहित शर्माच्या नावाचं स्टॅन्ड झाल्यानंतर वानखेडेच्या मैदानावरील भारताचे आणि आयपीएल सामने पाहण्याची मजा काही और असेल.

दिवेचा पॅव्हेलियनच्या लेव्हल-३ ला आता “रोहित शर्मा स्टँड” असे नाव देण्यात येईल. ग्रँड स्टँडचा लेव्हल-३ “शरद पवार स्टँड” म्हणून ओळखला जाईल. ग्रँड स्टँडचा लेव्हल-४ “अजित वाडेकर स्टँड” म्हणून ओळखला जाईल. मुंबई क्रिकेटला पुढे नेण्यात या तिन्ही दिग्गजांनी मोठे योगदान दिले आहे.

अजित वाडेकर भारताचे माजी कर्णधार होते, ज्यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये भारताला पहिल्या कसोटी मालिका जिंकण्यात मोठी भूमिका बजावली आणि ३७ कसोटी सामने खेळले. शरद पवार हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने नवीन उंची गाठली.

एमसीएच्या या निर्णयानंतर एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “हे निर्णय मुंबई क्रिकेटच्या आधारस्तंभांबद्दलचा आमचा आदर आणि भविष्यात अधिकाधिक ताकदीने पुढे जाण्याची आमची वचनबद्धता दर्शवतात.”

वानखेडे स्टेडियम हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित मैदानांपैकी एक आहे, जिथे २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यासारखे ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत. आता या स्टेडियममधील स्टँडना नावे देणं म्हणजे क्रिकेट जगतातील या महान व्यक्तिमत्त्वांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे स्टेडियमवर, रोहित शर्माने ११ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६ च्या सरासरीने ४०२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक आहे. टी-२० मध्ये, त्याने या प्रतिष्ठित मैदानावर २,५४३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.