Team India Fashion Show: भारतात चालू असलेल्या ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडिया नऊ विजयी सामन्यांसह पॉईंट टेबलमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने साखळी फेरीत गुणतालिकेत १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या यशाचे श्रेय तुफान फलंदाजी व भेदक गोलंदाजीसह कमालीच्या ताळमेळीला जाते. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने संघातील सकारात्मक वातावरणाविषयी सांगत आपण खेळीमेळीचे बॉण्डिंग कसे तयार केले आहे याविषयी भाष्य केले.
रोहित शर्मा म्हणाला की, टीममधील सदस्यांवरील ताण- तणाव कमी करण्यासाठी आम्ही विविध खेळ खेळत असतो. धर्मशाळा येथे एक दिवस आराम करत असताना आम्ही खेळाडूंचा एक फॅशन शो ठेवला होता. हे सगळंच आम्ही दाखवत नाही कारण काही गोष्टी खाजगी सुद्धा असायला हव्यात त्यामुळेच विजयी कोण झालं हे काही मला सांगायला जमणार नाही पण हे खरं की यामुळे सगळ्यांना एकत्र येण्यास मदत होते.
धर्मशाळा येथे टीम इंडियाचा फॅशन शो
पुढे रोहितने न्यूझीलंडविरुद्ध २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवाबद्दल सुद्धा भाष्य केलं, तो म्हणाला की, भूतकाळ हा भूतकाळ आहे आणि आपण आताच्या सामन्यात आपला संघ काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करायला हवे. मला वाटत नाही की दहा वर्षांपूर्वी किंवा पाच वर्षांपूर्वी किंवा शेवटच्या विश्वचषकाबद्दल काय झाले याबद्दल जास्त चर्चा करायला हवी.
हे ही वाचा<< IND vs NZ: रोहित शर्माने सांगितली, वानखेडेवर ‘टॉस’ ची भूमिका! भारतासाठी आज कोणती निवड असेल फायदेशीर?
टीम इंडियाने २०१४ पासून आयसीसी स्पर्धांमध्ये जबरदस्त धावा केल्या आहेत. २०२१ टी २० विश्वचषक वगळता प्रत्येक स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र असूनही ते विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, मेन इन ब्लूवर त्यांच्या घरच्या मैदानात करो वा मरो सामना जिंकून १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक विजय नोंदवण्यासाठी उत्सुक व थोडा फार चिंतेत सुद्धा असेल.