Rohit Sharma Dropped in IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली खेळताना दिसत आहेत. पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा-विराट कोहली दोघेही फ्लॉप ठरले. यानंतर ए़डलेडमध्ये दोघे चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. पण यादरम्यान रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट एडलेडमधून येत आहे. रोहितला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी वगळण्यात येण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे एडलेडच्या मैदानावरील एक व्हीडिओ आहे.
एडलेडमधील वनडे सामन्यापूर्वी, माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा नेटमध्ये सरावासाठी सर्वात आधी पोहोचला होता. त्याने नेट्समध्ये जोरदार सरावही केला. पण संपूर्ण सराव सत्रात रोहित शर्माचा मूड आणि त्याची बॉडी लँग्वेज नेहमीप्रमाणे दिसत नसल्याचं व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय तेथील उपस्थित पत्रकारांनीही रोहितला वगळण्यात येऊ शकतं अशी माहिती दिली आहे.
एडलेडच्या मैदानावरून मिळालेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या पर्यायी सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा खूपच वेगळा दिसत होता. तो पूर्वीसारखा दिसत नव्हता. तो एकटाच असल्याचे दिसून आले. सहसा, रोहित शर्मा संघातील सहकारी, माध्यम आणि चाहत्यांशी संवाद साधतो, पण यावेळी तसं चित्र दिसलं नाही. तो सरावानंतर जातानाही शांत दिसत होता. याशिवाय एडलेडच्या मैदानावर एक असं चित्र दिसून आलं त्यामुळे रोहित शर्माला नक्कीच दुसऱ्या वनडेमधून वगळण्यात येण्याची चर्चा सुरू झाली.
रोहित शर्माच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी मिळणार?
एडलेड एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव करताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि निवडकर्ता शिवसुंदर दास यांनी यशस्वी जैस्वाल यांच्याशी दीर्घ चर्चा केली. बराच वेळ ही चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, रोहित शर्मा सराव मैदानाबाहेर पडल्यानंतर ही चर्चा झाली. मंगळवारी यशस्वी जैस्वालनेही बराच वेळ फलंदाजीचा सराव सत्र केला.
तर, प्रश्न असा आहे की यशस्वी जैस्वाल रोहित शर्माची जागा घेईल का? निवडकर्त्यांनी रोहित शर्माला कळवलं आहे का की तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्पात आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. पण रोहित शर्माची एकूण बॉडी लँग्वेज पाहता या चर्चा निराधार नसल्याचेही दिसत आहे.
रेव्हस्पोर्ट्झ ग्लोबलच्या एका वृत्तानुसार, रोहित शर्मा एडलेडमध्ये खूपच वाईट मूडमध्ये असल्याचे दिसून आले. तो नेहमीसारखा दिसत नव्हता. असाही दावा करण्यात आला की रोहित कर्णधारपद सोडू इच्छित नव्हता. पण निवडकर्त्यांनी निर्णय घेतला आणि शुबमन गिलकडे सूत्रे सोपवली. रोहित शर्मा पर्थ वनडेमध्ये अपयशी ठरला होता. त्यामुळे आता रोहितला एडलेडमध्ये खेळण्याची संधी मिळणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
