Why Rohit Sharma Retired From Test Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट कर्णधार राहिलेल्या रोहित शर्माने अचानक ७ मे रोजी कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर फक्त एक स्टोरी पोस्ट करत मी निवृत्त होत असल्याचे सांगितले. पण रोहितच्या या अचानक निवृत्तीच्या निर्णयाने सर्वच अवाक् झाले. कारण दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला होता, तो इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. पण आता अचानक रोहितने निवृत्ती जाहीर केली. यादरम्यान एक रिपोर्ट समोर आला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी रोहितच्या वक्तव्यानंतर सर्वांना आशा होती की इंग्लंड दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. पण अचानक काय झालं की रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली, हा प्रश्न सर्वांना पडला असतानाच एका रिपोर्टमध्ये चकित करणारी माहिती समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका रिपोर्टमध्ये समोर आलं की, रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत नव्हता, त्याला इंग्लंड दौऱ्यावर जायचे होते आणि त्याला दोन कसोटी सामने खेळून स्वत:ला तपासायतं होतं. त्याने निवडकर्त्यांसमोर कर्णधारपद सोडण्याचा प्रस्ताव मांडला पण त्याला २ कसोटी सामने खेळायचे होते पण निवडकर्त्यांनी ते मान्य केलं नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि निवडकर्त्यांमध्ये आठवडाभर चर्चा सुरू होती. यादरम्यान, रोहितने त्यांना सांगितले की त्याला दोन कसोटी सामने खेळायचे आहेत आणि लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो कशी कामगिरी करतोय हे पाहायचं आहे. रोहितने कर्णधारपद सोडण्याची ऑफर दिली पण निवडकर्त्यांना अशा खेळाडूची कर्णधार म्हणून नियुक्ती करायची होती, जो संपूर्ण मालिकेत संघाचे नेतृत्व करू शकेल. निवडकर्त्यांच्या या विचारानंतर रोहितने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले.

बीसीसीआयच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, “रोहितने स्वत: कर्णधारपद सोडत असल्याची ऑफर दिली. गेल्या आठवड्यात त्याने निवडकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि सांगितलं की तुम्ही कर्णधारपदासाठी इतर पर्याय निवडा. त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळून स्वत:ला तपासायचे होते. पण निवडकर्त्यांना ही कल्पना पटली नाही.”

निवडकर्ते रोहित शर्मा आणि गौतम गंभीरबरोबर होणाऱ्या चर्चेची माहिती देत होते. रोहितला सांगण्यात आले की त्याची ही कल्पना संघाला अस्थिर करेल आणि त्याच्या नेतृत्त्वासाठीही चांगली नसेल. रोहितचा गेल्या दोन कसोटी मालिकांमधील फॉर्मही चिंतेचा विषय होता. निवडकर्त्यांच्या मते त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा होण्याबाबतही संभ्रमात होते.

बीसीसीआयच्या सूत्राने याबाबत पुढे सांगितले की, “रोहितला संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध होण्याची कमिटमेंट मागितली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनने अचानक निवृत्ती घेऊन बाहेर पडल्याने जो गोंधळ झाला तसा गोंधळ निवडकर्त्यांना नको होता. रोहितने देखील ते मान्य केलं आणि निवृत्तीचा निर्णय घेतला.”

रिपोर्ट्सनुसार रोहितच्या भविष्याचा निर्णय घेताना, काही काळासाठी विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवण्यावरही चर्चा झाली. जसप्रीत बुमराहच्या नावाचाही विचार करण्यात आला. इंग्लंड दौऱ्यासाठी नेतृत्त्वाकरता दोघांच्याही नावांवर बरीच चर्चा झाली पण शेवटी संपूर्ण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघ कर्णधार नियुक्त करेल असा निर्णय घेण्यात आला.

शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या नावाचा कर्णधारपदासाठी विचार केला जात आहे. परंतु पंतचा सध्याचा फॉर्म खराब आहे आणि शुबमन गिलला विदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करता आलेले नाही. केएल राहुल हा देखील एक पर्याय आहे. टीम इंडियाचे निवडकर्ते काय निर्णय घेतात यावर सर्वांच्या नजरा आहेत.