Sneh Rana On Rohit Sharma: आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ स्पर्धा भारतात पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने या स्पर्धेतील ३ महत्वाचे सामने गमावले होते. त्यानंतर निर्णायक सामन्यात न्यूझीलंडला निर्णायक सामन्यात पराभूत करून भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. दरम्यान फायनलमध्ये भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने देखील हजेरी लावली होती.
या स्पर्धेतील फायनलचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना पाहण्यासाठी भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण देखील उपस्थित होते. दरम्यान रोहितला स्टँडमध्ये बसून सपोर्ट करताना पाहून भारतीय संघातील खेळाडू भावूक झाले होते.
विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर खेळाडू आपल्या घरी परतले आहेत. आपल्या राज्यात परतल्यानंतर राज्य सरकारकडून आणि क्रिकेट चाहत्यांकडून खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दरम्यान भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू स्नेह राणाने एका मुलाखतीत रोहित शर्मा स्टेडियमममध्ये भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी आला त्यावेळी भारतीय संघात नेमकं कसं वातावरण होतं? यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
स्नेह राणा म्हणाली, “रोहित शर्मा आमचा विश्वचषकातील अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. ते खूप भावूक झाले होते. ते भावुक झाल्याचे पाहून आम्ही देखील भावूक झालो.” भारतीय खेळाडूंनी कोणालाच निराश केलं नाही. भारतीय संघावर साखळी फेरीतून बाहेर पडण्याचं संकट होतं. पण शेवटी भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदाच जेतेपदाचा मान मिळवला.
हा क्षण भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप महत्वाचा आहे. कारण गेल्या ५२ वर्षांत भारतीय संघाला एकदाही आयसीसीच्या जेतेपदाची ट्रॉफी जिंकता आली नव्हती. भारताने याआधी २ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण दोन्ही वेळेस भारताचा पराभव झाला होता. पण यावेळी भारतीय खेळाडूंनी पूर्ण जोर लावला आणि जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.
