रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सामना मुंबई इंडियन्सशी

दुबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी होणाऱ्या ‘आयपीएल’ लढतीकडे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय ताऱ्यांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.

भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि भावी कर्णधार रोहित शर्मा हे अनुक्रमे बेंगळूरु आणि मुंबईचे नेतृत्व करीत असल्यामुळे हा सामना औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. बेंगळूरुने ९ सामन्यांत १० गुणांसह अव्वल चार सघांमधील स्थान टिकवले आहे, तर गतविजेता मुंबईचा संघ (९ सामन्यांत ८ गुण) सहाव्या स्थानावर आहे. उभय संघांनी आपले दोन्ही सामने कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज याच संघांविरुद्ध गमावले आहेत.

कोहली, रोहित, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या ही भारताची आघाडीची फळी या दोन संघांमध्ये आहे. तंदुरुस्तीअभावी आतापर्यंतच्या सामन्यांना मुकलेला हार्दिक रविवारच्या सामन्यात खेळणार असल्याचे मुंबईने स्पष्ट केले आहे. चेन्नईविरुद्ध कोहलीने अर्धशतक साकारले, पण तरीही संघ अपयशी ठरला.

’  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)