एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपामुळे बांगलादेशचा क्रिकेटपटू रुबेल होसैन याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, रुबेलचा बांगलादेशच्या विश्वचषकासाठीच्या संघात समावेश करण्यात आला आहे. १९ वर्षांच्या नाझनिन अक्तेर हॅप्पी या अभिनेत्रीने ढाकामधील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे रुबेलविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिन्यात आपल्याला लग्नाची खोटी आमिषे दाखवून रुबेलने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप नाझनिनने केला आहे. महानगर दंडाधिकाऱ्यांनी रुबेलचा जामीन अर्ज फेटाळला असून पुढील सुनावणी होईपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे ढाक्याचे पोलीस उपायुक्त अनिसूर रहमान यांनी सांगितले. पुढील सुनावणीची तारीख मात्र निश्चित करण्यात आलेली नाही. नाझनिन हिची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून दोघांनाही डीएनए चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे विश्वचषकात रुबेलला सहभागी होता येईल का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.