Ruturaj Gaikwad bowls and takes a wicket Video: १८ ऑगस्टपासून चेन्नईमध्ये बुची बाबू ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगढ यांच्यात सामना खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस महाराष्ट्र संघासाठी खूप चांगला ठरला. आपल्या फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋतुराजने गोलंदाजी करत संघाला विकेट मिळवून दिली.

पहिल्या दिवशी गायकवाडने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, तर पृथ्वी शॉने क्षेत्ररक्षणात तीन झेल कमालीचे झेल टिपले. गायकवाड आणि पृथ्वी शॉ पहिल्यांदाच एकत्र खेळताना दिसत आहेत. त्यांची कामगिरी मात्र लक्षवेधी ठरली आहे.

महाराष्ट्रविरूद्धच्या सामन्यात छत्तीसगढने प्रथम फलंदाजी करत ८९.३ षटकांत २५२ धावा केल्या. महाराष्ट्राकडून हितेश वाळुंज आणि विकी ओस्तवाल यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पण छत्तीसगढकडून शशांक तिवारी आणि सौरभ मजुमदार यांनी शेवटच्या विकेटसाठी केलेली भागीदारी महाराष्ट्राच्या गोलंदाजांची शाळा घेणारी ठरली. यादरम्यानच महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने दिवसाच्या शेवटच्या षटकात ऋतुराज गायकवाडच्या हाती चेंडू सोपवला.

ऋतुराजने कमालीचा चेंडू टाकत घेतली विकेट

गायकवाडने त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली. पहिल्या चेंडूवर फलंदाजाने एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सौरभ मजुमदारने षटकार खेचला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना तो गायकवाडच्या हाती झेलबाद झाला. या विकेटसह छत्तीसगढचा संघ २५२ धावांवर ऑलआउट झाला. दरम्यान, ऋतुराजच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

छत्तीसगढचा फलंदाज संजीत देसाईचं अवघ्या काही धावांनी शतक हुकलं. संजीत देसाईने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अविनाश सिंगनेही अर्धशतक झळकावलं. या डावात संघाच्या अनेक फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली पण त्यांचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाहीत. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघ चांगली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.

बूची बाबू स्पर्धा म्हणजे काय?

बूची बाबू स्पर्धा ही देशांतर्गत क्रिकेट हंगामापूर्वी दरवर्षी आयोजित केली जाते. बुची बाबू ट्रॉफी सहा वर्षांच्या विश्रांतीनंतर २०२३ मध्ये परतली. भारतातील सर्वात जुन्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक मानली जाणारी ही ट्रॉफी तामिळनाडूमधील क्रिकेटचे जनक म्हणून ओळखले जाणारे मोठावरापु वेंकट महिपती नायडू, म्हणजेच बुची बाबू नायडू यांच्या नावाने ओळखली जाते.

एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्याशिवाय तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (TNCA) कडून निवडलेले दोन विशेष संघ प्रेसीडेंट्स इलेव्हन आणि TNCA इलेव्हन देखील खेळणार आहेत. ही स्पर्धा चेन्नईतील विविध मैदानांवर खेळवली जात असून, विजेत्या संघाला ३ लाख रुपये तर उपविजेत्या संघाला २ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे.