भारत अ आणि दक्षिण आफ्रिा अ यांच्यात पहिला अनऑफिशियल वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखालील भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा पराभव केला. ऋतुराज गायकवाडच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका अ संघाला ४ विकेट्सने पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने २८५ धावांचा डोंगर उभारला, पण भारताच्या फलंदाजांनी संघाला विजय मिळवून दिला, ज्यात ऋतुराजची सर्वात महत्त्वाची भूमिका होती.
राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्याची नाणेफेक दक्षिण आफ्रिका अ संघाने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २८५ धावा केल्या आहेत. तर प्रत्युत्तरात भारतीय संघाने ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर ४९.३ षटकांत ६ विकेट्स गमावत २९० धावा करत विजय मिळवला.
ऋतुराज गायकवाडने १२९ चेंडूत १२ चौकारांसह ११७ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि भारत अ संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. दक्षिण आफ्रिका अ संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत ऋतुराजने शतकी खेळी केली. ऋतुराज सध्या उत्कृष्ट फॉर्मात असून त्याने बूची बाबू स्पर्धा, दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि आता भारत अ संघाकडून खेळताना शतकं झळकावली आहेत.
ऋतुराज गायकवाडसह अभिषेक शर्माने पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची शानदार भागीदारी रचली. अभिषेकने २५ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३१ धावा केल्या. कर्णधार तिलक वर्माने ३९ धावांचे योगदान दिले. इशान किशनने २१ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने ३७ धावांची तर निशांत सिंधुनेही महत्त्वपूर्ण २९ धावांची खेळी केली. तर हर्षित राणाने एक षटकार लगावत संघाचा विजय निश्चित केला.
दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खूप खराब झाली. आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले, तर डेलानो पॉटगीटरने ९० धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला, यामध्ये त्याने १० चौकार आणि एक षटकार लगावला. ब्योर्न फोर्टुइनने ५९ धावांचे योगदान दिले, तर डायन फॉरेस्टरनेही ७७ धावा केल्या. या तिन्ही खेळाडूंच्या अर्धशतकांमुळे दक्षिण आफ्रिकेने २८५ धावांचा सन्मानजनक आकडा गाठला.
भारतीय अ संघाकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अर्शदीपने १० षटकांत ५९ धावा दिल्या, तर हर्षितने १० षटकांत ४९ धावा दिल्या. त्याच्याशिवाय प्रसिध कृष्णा, निशांत संधू, रियान पराग आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
