भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली केपटाऊन कसोटी खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. याबाबतची माहिती त्याने पत्रकार परिषदेत दिली. पाठदुखीमुळे विराट जोहान्सबर्ग कसोटीत खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने जोहान्सबर्ग कसोटीचे नेतृत्व केले. या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या दौऱ्यावर विराट कोहली पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरा गेला. सांघिक संयोजनाशिवाय स्वत:चा फॉर्म आणि इतर अनेक प्रश्नांनाही त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

पत्रकार परिषदेत विराट कोहलीला त्याच्या अलीकडच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, ”मी खूप दिवसांपासून हे ऐकत आहे. ही काही पहिलीच वेळ नाही. मी केलेल्या विक्रमांशी माझी तुलना होत राहते. मला संघासाठी चांगली कामगिरी करत राहायचे आहे. बाहेर काय चालले आहे, माझ्याबद्दल काय बोलले जात आहे याचा मी जास्त विचार करत नाही आणि मला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.”

मोहम्मद सिराजच्या दुखापतीबाबतही विराटने अपडेट दिले. त्याने सांगितले, ”सिराज फिट नाही. आम्ही आज त्याच्याबद्दल बोलू आणि त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश करायचा हे ठरवू. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे.”

हेही वाचा – ICC Player Of The Month : भारतीय क्रिकेटपटूला मागे सारत ‘मुंबईकरानं’ जिंकला पुरस्कार; वाचा कोण ठरलं सर्वोत्तम

विराटने भारताच्या वेगवान आक्रमणाचेही त्यांनी कौतुक केले. तो म्हणाला, “मी जेव्हा कर्णधारपद स्वीकारले, तेव्हा आम्ही सातव्या क्रमांकाचा संघ होतो आणि आता गेल्या ४-५ वर्षांपासून आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. मी संघाची दृष्टी ठरवली आणि मग त्या मार्गावर चालायला सुरुवात केली. शीर्षस्थानी राहण्यासाठी आम्हाला प्रत्येक सामना पूर्ण उत्साहाने खेळावा लागेल.

आमच्याकडे आज उत्तम वेगवान आक्रमण आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी प्लेइंग-११ मध्ये कोणाचा समावेश करायचा आणि कोणाला बाहेर बसवायचे या संभ्रमात असतो. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमची कसोटी कामगिरी आमच्या वेगवान गोलंदाजांवर अवलंबून आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या ११ जानेवारीपासून दोन्ही संघात निर्णायक कसोटी खेळवली जाणार आहे. आत्तापर्यंत एकदाही भारताने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही.