.. अख्ख्या रिकी कुटोला सचिनने बॅगमध्ये भरले होते!

कुटो बंधूंनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आतापर्यंत बऱ्याच विश्वविक्रमांना गवसणी घातली असली, तरी त्याच्या शालेय जीवनापासूनची वाटचाल विसरता येऊ शकत नाही.

कुटो बंधूंनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आतापर्यंत बऱ्याच विश्वविक्रमांना गवसणी घातली असली, तरी त्याच्या शालेय जीवनापासूनची वाटचाल विसरता येऊ शकत नाही. त्याच्या या वाटचालींचे साक्षीदार आहेत ते मार्कस आणि रिकी हे कुटो बंधू. रिकी हे सचिनच्या वर्गात होते, तर मार्कस हे त्या वेळी सांख्यिकी म्हणून काम करायचे. बालपणी सचिनशी फार जवळचा संबंध आला असल्यामुळे कुटो बंधू त्याच्या अनेक आठवणींमध्ये रमतात.
सचिनची क्रिकेटविश्वाला पहिली ओळख झाली ती हॅरिस शिल्डमधील विनोद कांबळीबरोबरच्या ६६४ धावांच्या भागीदारीमुळे. या भागीदारीचे साक्षीदार असलेला आणि हा विक्रम असल्याचे ज्यांनी साऱ्यांना सांगितले, ते मार्कस म्हणाले की, ‘‘सचिन-कांबळी हे फलंदाजी करीत असताना मोठी धावसंख्या उभारल्यावर प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी डाव घोषित करायचा संदेश पाठवला होता, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्यानंतर फलंदाजीला येणाऱ्या अमोलने कंटाळून पॅड काढले, तर पंचांचे हातही चौकार आणि षटकार देऊन दुखत होते. त्यानंतर पंचांनी पहिल्यांदा चौकार घोषित करायचे टाळले. त्यांना सचिन-कांबळीला दमवायचे होते, जेणेकरून ते डाव घोषित करतील. पण ते दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होते. हा सामना संपल्यावर हा विक्रम आहे की नाही, याचा मी तपास सुरू केला. बऱ्याच ठिकाणी फिरलो, अखेर मोहनदास मेनन यांनी आम्हाला या विक्रमाबद्दल सांगितले आणि गुणपत्रिका मागितली. आम्ही ती घेऊन गेलो, तेव्हा चौकार-षटकारांनी खूप गर्दी त्यावर होती. पण त्यामध्ये तीन धावांचा हिशोब लागत नव्हता. अखेर आम्ही सचिनच्या तीन धावा काढून ती गुणपत्रिका विस्डेनकडे पाठवली आणि त्यांच्या विक्रमाची नोंद झाली. परंतु अजूनही ‘त्या तीन धावा माझ्याच का कापल्या?’ असा प्रश्न सचिन विचारतो.’’सचिन भारतासाठी खेळण्यापूर्वी पाकिस्तानसाठी खेळला, हीसुद्धा आठवण मार्कस यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘‘१९८७मध्ये सीसीआयच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजसिंग डुंगरपूर यांनी भारत-पाकिस्तान अनधिकृत सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यात पाकिस्तानला काही क्षेत्ररक्षकांची गरज होती. तेव्हा कुणी जायला तयार नव्हते, पण सचिनने स्वत:हून विचारले आणि तो क्षेत्ररक्षणासाठी गेला. त्या वेळी इम्रानने त्याला सीमारेषेजवळ उभे केले होते. त्या वेळी कपिलचा एक झेल त्याच्या डोक्यावरून गेला. त्या वेळी इम्रान कुठे चुकत होता, हे तो आम्हाला सांगत होता. या सामन्यानंतर सचिन लोकल पकडून घरी गेला आणि हा त्याचा अखेरचा लोकल प्रवास ठरला.’’
याचप्रमाणे रिकी यांनी शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ‘‘शालेय दिवसांतच तो आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल, असे आम्हाला वाटले होते. आम्ही शाळेत मागच्या बाकावर बसायचो आणि मस्ती करायचो. सचिन हा पैज लावण्यामध्ये सर्वात पुढे असायचा. कधी शाळेतून लवकर सुटका झाली किंवा क्वचित प्रसंगी दांडी मारून आम्ही मरीन ड्राइव्हला फिरायला जायचो, तर कधी सिनेमाला जायचो. सचिनला अमिताभ बच्चन फार आवडायचा, त्यांना एकदा तरी भेटायला हवे, ही त्याची इच्छा होती. वडापाव त्याला खूप आवडायचा. सचिनला वर्गात पंजा लढवायला आवडायचे आणि त्यामध्ये तो कधीही हरला नाही.’’
सचिनच्या खटय़ाळकीचा आणखी एक किस्सा रिकी यांनी सांगितला. ते म्हणाले, ‘‘एकदा सचिन इंग्लंडला जाऊन मोठी किट बॅग घेऊन आला होता. ती बॅग त्याने आम्हाला दाखवली, त्या वेळी कांबळी त्याला म्हणाला की, या रिकीला या बॅगेत भरून दाखव. सचिनने क्षणाचाही विलंब न लावता बॅगेतील साहित्य काढले आणि मला भरून बॅग बंदही करून दाखवली. पण तेव्हाच्या आमच्या मित्रांमध्ये अजून काहीच फरक पडलेला नाही. त्याने अजूनही आमची ओळख ठेवली आहे, हीच त्याची महानता आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sachin packed his friend ricky kuto in bag