‘एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे. ‘मंकडिंग’ला धावचीत घोषित करणे, चेंडूची लकाकी वाढवण्यासाठी लाळेच्या वापरास पूर्णत: बंदी आदी अनेक बदल १ ऑक्टोबरपासून अमलात येणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नव्या नियमांनिशी खेळाडूंचा कस लागणार आहे. एमसीसी ही संस्था क्रिकेट कायद्यांचे संरक्षक आहे. मंकडिंग बाद, लाळेचा वापर, वाइड बॉल आणि डेड बॉलसह अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. हे सर्व नियम यावर्षी १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या नियमांबाबत मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेट देव म्हणून ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकर यांनीही याला सहमती दर्शवली आहे.

सचिन तेंडुलरकर यांनी सांगितले की, “एमसीसी समितीने नवीन नियम जारी केले आहेत. मी यापैकी काही नियमांचे समर्थन करतो. पहिला नियम म्हणजे मंकडिंग आउट आहे. यापूर्वी मंकडिंग हा शब्द वापरल्याने मला नेहमीच अस्वस्थ वाटले आहे. मात्र याचे रूपांतर आता धावबादमध्ये झाले याचा मला खूप आनंद आहे. माझ्या मते धावबाद असायलाच हवा, त्यामुळे आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. तर दुसरा नियम बॅटर झेलबाद झाल्यानंतर मिळणाऱ्या स्ट्राइकबाबतचा आहे. नव्या नियमामुळे झेल पकडताना दोन्ही खेळाडूंनी धाव घेतली आणि झेलबाद झाला. तरी नव्या फलंदाजाला फलंदाजीसाठी स्ट्राइक यावं लागेल. हा नियम अगदी बरोबर आहे, कारण एखाद्या गोलंदाजाने गडी बाद केला तर त्याला नवीन फलंदाजाला गोलंदाजी करून विकेट घेण्याची संधी मिळेल.”

क्रिकेटमध्ये इतिहासात १९४८मध्ये ‘मंकडिंग’नुसार प्रथम धावचीत केल्याची नोंद आढळते. भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज बिल ब्राऊन यांना, त्यांनी नॉन-स्ट्रायकरला क्रीझ सोडली असताना या पद्धतीने धावचीत केले होते. मंकड यांनी ब्राऊन याला आधी अनेकदा ताकीदसुद्धा दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी या प्रकाराला ‘मंकडिंग’ असेच नाव दिले. या पद्धतीने बाद करणे हे खेळभावनेच्या विरोधातील असे मानले गेल्याने सुनील गावस्कर यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार, तर ट्वेन्टी-२० आणि महिला क्रिकेटमध्ये एकेक ‘मंकडिंग’च्या घटना घडल्या होत्या. २०१९च्या ‘आयपीएल’मध्ये फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

कलम क्रमांक १८नुसार फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज स्ट्राइकला म्हणजेच फलंदाजीला येईल. बाद झालेला खेळाडू नॉन-स्ट्राइकला म्हणजेच समोरच्या बाजूला पोहोचला असेल तरी नवा फलंदाज हाच फलंदाजी करील. तो षटकातील अखेरचा चेंडू असल्यास मात्र स्ट्राइक बदलला जाईल. आतापर्यंत एखादा फलंदाज झेलबाद होण्याआधी धाव घेताना त्याने समोरील फलंदाजाला मागे टाकले असेल तर नवा फलंदाज स्ट्राइकरऐवजी नॉन-स्ट्राइकर एंडला येत असे. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेत हा नियम लागू केला होता.