Sachin Tendulkar Remembers his father in emotional post: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणीत भावुक झाला. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने वडिलांच्या खुर्चीसोबतचा फोटो आणि त्यांच्या काही पुस्तकांचाही फोटो त्यात आहे. या पोस्टवरील सचिनच्या कॅप्शनने सर्वांनाच भावुक केलं आहे.

१९ मे १९९९ मध्ये सचिन २६ वर्षांचा असताना त्याचे वडिल रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. त्यावेळेस विश्वचषकासाठी सचिन इंग्लंडमध्ये होता. स्पर्धेदरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले. त्याला लगेचच संघ सोडून वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात यावे लागले. यानंतरही मास्टर ब्लास्टरने हार मानली नाही. डोंगराएवढं दु:ख असतानाही सचिन पुन्हा इंग्लंडला गेला आणि पुढच्याच सामन्यात त्याने केनियाविरुद्ध शानदार शतक झळकावले. हे शतक त्याने आभाळाकडे पाहत त्याच्या वडिलांना समर्पित केले होते.

सचिनने वडिलांसाठी केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “बाबा आमच्यातून निघून गेले याला २५ वर्षे झालीत, पण आजही त्यांच्या जुन्या खुर्चीजवळ उभे राहिल्यावर वाटते की ते अजूनही आमच्यात आहेत. मी त्यावेळी फक्त २६ वर्षांचा होतो आणि आता ५१ व्या वर्षी, त्यांनी माझ्या आयुष्यावर आणि इतर अनेकांच्या जीवनावर किती प्रभाव पाडला हे मला अधिक स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या २५ व्या पुण्यतिथीला ४३ वर्षांनंतर या ठिकाणाला भेट देणे अत्यंत भावूक करणारे होते. त्यांची बुद्धीमत्ता आणि सर्वांवरील प्रेम मला सतत प्रेरणा देतं. बाबा, मला रोज तुमची आठवण येते आणि आशा आहे की माझ्यामध्ये जी मूल्ये तुम्ही रुजवलीत त्यानुसार मी जगत आहे.”

सचिनने क्रिकेटच्या दुनियेत आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. आज सचिन तेंडुलकर फक्त खेळाडूच नाही तर त्याला क्रिकेटचा देव असंही म्हटलं जात. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक असे विक्रम आपल्या नावे केले आहेत जे कायमच मास्टर ब्लास्टरतच्या नावावर असतील. क्रिकेटच्या दुनियेत १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे, त्यापैकी ५१ शतके कसोटीमध्ये आणि ४९ शतके वनडेमध्ये केली आहेत.