सचिन तेंडुलकरच्या घराच्या आत, तळघरातील कार्यालयात, एका छोटय़ा कॉन्फरन्स रूमच्या भिंतीवर ‘मिड-डे’च्या अतुल कांबळेने काढलेले त्याचे प्रसिद्ध छायाचित्र आहे. सचिनच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान काढलेल्या या छायाचित्राला ‘विस्डेन-एमसीसी क्रिकेट फोटोग्राफ ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे.

सचिन ड्रेसिंग रूममधून बाहेर पडतो आणि आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय डाव खेळण्यापूर्वी पायऱ्यांच्या वरच्या बाजूस थांबतो. सूर्याची किरणे सचिनला लख्ख चमकवत असतात. काही फूट खाली चाहते सचिनला अखेरचे फलंदाजीला जाताना पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यापैकी प्रत्येकच जण हात लांब करून आपापल्या मोबाइलमध्ये सचिनचे छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न करत असतो. जणू काही ते सचिनलाच स्पर्श करण्याचा प्रयत्न असल्याचा या छायाचित्रातून भास होतो. सूर्यास्तापूर्वीचे अखेरचे दर्शन. सचिन अखेरच्या डावासाठी पूर्णपणे सज्ज असतो.

‘‘जेव्हा कोणीतरी पाच फूट दूर असते आणि सर्व कॅमेरे फ्लॅश होतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण असते. जे घडत आहे, त्याची तुम्हाला कल्पना असते. या सगळय़ा गोष्टी घडतील हे तुम्हाला अपेक्षितच असते. तो तुमच्या तयारीचा एक भाग असतो. केवळ गोलंदाज काय करत आहे याविषयी नाही, तर तयारीच्या वेळी तुम्ही अन्य गोष्टींचाही विचार करता. खेळपट्टी कशी असेल, मैदान कसे असेल, चाहत्यांचा आवाज या सगळय़ाचा तुम्हाला विचार करावा लागतो,’’ असे सचिन म्हणतो.

त्याला अपेक्षांचे दडपण जाणवले नाही का? अपेक्षांच्या ओझ्यामुळे त्याची कामगिरी खालावली का? ‘‘मी कधी तसा विचार केला नाही. जर मी अपयशी झालो, तर मी त्यांच्याप्रमाणेच दु:खी असतो. माझाही दिवस खराब गेला असता. मात्र, दिवसाच्या अखेरीस मी पुन्हा योग्य मानसिकतेत परतणे गरजेचे होते.’’

‘जेव्हा तुम्ही खेळापासून दूर होता, तेव्हा लोक तुम्हाला काही गोष्टी सांगतात. ‘मी फलंदाजी करत असताना असे सारे घडत होते आणि मला याची कल्पनाही नव्हती’ असे तुम्हाला वाटून जाते.’’

अलौकिक यश मिळवल्यानंतरही पाय जमिनीवर असण्याला कुटुंब कारणीभूत असल्याचे सचिन सांगतो. ‘‘घरातील वातावरणाची मला मदत झाली. कुटुंबीयांनी मला कधीही ‘सुपरस्टार’ असल्यासारखे वागवले नाही. ते सामान्य होते. मी घरी आल्यावर त्यांना आनंद व्हायचा. मात्र, त्यांनी उत्साहाच्या भरात वेगळय़ा पद्धतीने आनंद साजरा केला नाही. परंतु आई आवर्जून काहीतरी छान खायला बनवायची. कौतुक, प्रेम दाखवण्याचा हा आमचा मार्ग होता आणि ते कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे होते,’’ असे सचिन म्हणतो.

‘‘आमच्या घरी एक अलिखित नियम होता – जगाला गेल्या खेळीबद्दल बोलू द्या, आपण पुढच्या खेळीचा विचार करायचा. त्यामुळे भारतासाठी खेळण्याच्या आधीपासूनच मी काय करायला हवे याचाच सतत विचार करत असायचो.’’

सचिनला फलंदाज म्हणून आत्मविश्वास होताच आणि त्याने फलंदाजीच्या मूलतत्त्वांशी तडजोड केली नाही. मुंबईच्या मैदानांवर क्रिकेटचे धडे गिरवलेल्या फलंदाजाचे (बॉम्बे स्कूल ऑफ बॅट्समॅनशिप) आत्म-नियंत्रणाचे हे वैशिष्टय़ आहे.कारकीर्दीच्या सुरुवातीस सचिनला सुनील गावस्कर आणि विवियन रिचर्डस या दोन फलंदाजीच्या देवतांचे मिश्रण, असे म्हटले जायचे. मात्र, दरम्यानच्या काळात रिचर्डस यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण मागे सोडून तो गावस्करांच्या वाटेवर गेला. सचिन कधीही फटकेबाजी करून मनोरंजन करण्यात गुंतला नाही; त्याने कायम गोलंदाजांना थोपवण्याचा प्रयत्न केला.कधी आक्रमण करायचे आणि कधी बचावात्मक खेळ करायचा हे तो स्वत: ठरवायचा. गोलंदाज त्याला काही तरी वेगळे करण्यास भाग पाडूच शकत नव्हते. अलौकिक बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती आवश्यक आहे ते करतो; परंतु स्वत:च्या आवडीनुसार.

सचिन याबाबत सहमत होतो. ‘‘ १९९९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी मला फलंदाजीची संधी मिळाली. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज माझ्या शरीरापासून दूर जाणारे चेंडू टाकत होते. मॅकग्राने माझ्याविरुद्ध चार-पाच निर्धाव षटके टाकली. मी चेंडू सोडत राहिलो. दोन-तीन वेळा चेंडू माझ्या बॅटच्या अगदी जवळून गेला. मी माझा नैसर्गिक खेळ करत नव्हतो, मी कोशात गेलो होतो, असे त्या वेळी म्हटले गेले. पुढील दिवशी सकाळच्या सत्रात पुन्हा माझ्याविरुद्ध तशीच गोलंदाजी झाली. मात्र, पहिल्याच षटकात मी दोन चौकार मारले,’’ अशी आठवण सचिनने सांगितली.

‘‘शेन वॉर्नने त्याच दौऱ्यावर नंतर मला सांगितले की, ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळी ऑस्ट्रेलियन संघाची बैठक झाली आणि त्यात माझ्या शरीरापासून दूर चेंडू टाकण्याचा निर्णय झाला. चेंडू मारता येत नसल्याने माझा संयम सुटेल आणि मी चूक करेन असे ऑस्ट्रेलियन संघाला वाटले होते. मात्र, त्यांची ही योजना फसली. मला त्यांच्या योजनेचा आधीच अंदाज आला होता. ‘कुठे चेंडू टाकल्यास मी फटका मारणार किंवा फटका मारणार नाही हे तुम्ही ठरवणार नाही. हा निर्णय पूर्णपणे माझा असेल,’ असे मी स्वत:शी म्हणालो होतो. तुम्हाला मी माझ्या शरीराच्या जवळ चेंडू टाकण्यास भाग पाडणार ही माझी योजना होती. त्यांनी त्यांच्या योजनेनुसार गोलंदाजी केली आणि मी माझ्या योजनेनुसार खेळलो. मी केवळ फलंदाजीच्या तंत्राचा विचार करू शकत नाही. गोलंदाज मला काय करण्यास प्रवृत्त करत आहे, याचाही मी विचार करणे आवश्यक आहे. मी हे नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना शिकलो. मी तिथे माझ्या मित्रांच्या मानसिकतेची कसोटी पाहायचो. तिथे मला खूप काही शिकायला मिळायचे. गोलंदाजावर मानसिकदृष्टय़ा दडपण कसे आणायचे आणि तो काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे कसे समजायचे, या गोष्टी शिकवल्या जाऊ शकत नाहीत. काही गोष्टी तुम्हाला स्वत:ला शिकाव्या लागतात.’’

‘‘कधी तरी तुमच्याकडे चेंडू मारण्यापूर्वी खूप वेळ असतो, तर कधी नसतो. तुम्ही स्पष्ट मानसिकतेनिशी खेळणे गरजेचे आहे. त्या संध्याकाळी, जगाला मी लढाई हरलो असे वाटले. परंतु, ऑस्ट्रेलियन संघाला माहीत होते की, मी लढाई जिंकली होती आणि हे मलाही ठाऊक होते. वॉर्नने मला सांगितल्यानुसार, त्या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू म्हणाले की, ‘आपण संकटात आहोत, तो (तेंडुलकर) वेगळय़ा शैलीत खेळत आहे.’ पुढील दिवशी सकाळी मी त्याच जागेवरील चेंडूवर दोन चौकार मारले – तो एक संदेश होता की, मी कधी खेळायचे आणि चेंडू कधी सोडायचा हे स्वत:च ठरवेन,’’ असे सचिन सांगतो.

भारतासारख्या क्रिकेटप्रेमी राष्ट्रात खेळाडूच्या प्रत्येक कृतीकडे चाहत्यांचे लक्ष असते. सचिन फलंदाजी करताना चेंडू खेळण्यापूर्वी करणाऱ्या कृतीपासून ते गोलंदाजी करण्यापूर्वी आपला उजवा हात हलवून कडे (‘‘मी साखरपुडय़ाच्या वेळी अंजलीला अंगठीऐवजी कडे देण्यास सांगितले होते. अंगठी हरवण्याची भीती असते; पण कडय़ाबाबत तशी चिंता नाही. मला फलंदाजी करतानाही कडे काढावे लागत नसे’’) वर करण्यापर्यंत तेंडुलकरच्या प्रत्येक कृतीकडे सर्वाचे लक्ष असायचे. मात्र, या दरम्यान एका गोष्टीकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले, ते म्हणजे सचिन त्याच्या गोलंदाजीकडे फलंदाजीच्या ताणापासून दूर जाण्याचा मार्ग म्हणून पाहायचा.

‘‘इतर फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी करणे मला खूप काही शिकवून गेले. क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाज आणि गोलंदाज या दोघांच्याही दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. तुमचे मन जेव्हा समोरील दिशेकडील खेळाडूप्रमाणे विचार करत असते (फलंदाज असल्यास गोलंदाजाचा व गोलंदाज असल्यास फलंदाजाचा), तेव्हा तुम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळता. जर तुमचे मन तुमच्या टोकाला अडकले असेल, तर तुम्ही अडचणीत सापडता. फलंदाजी करताना तुम्ही केवळ तुमच्या तंत्राचा विचार करू शकत नाही.’’

वेगवान ‘बॅट-स्पीड’ किंवा सरळ बॅट ठेवून चेंडू टोलवण्याची क्षमता किंवा पायाची अचूक हालचाल किंवा ‘बॅकफूट’वरून आश्चर्यकारक फटके, यात सचिनची महानता दडलेली नाही. ती दडली आहे, त्याचे गोलंदाजाविषयीचे कयास, तो स्वत:च्या मनावर कसा ताबा ठेवतो आणि कशा प्रकारे मनाच्या विपरीत खेळ करतो यात.

‘‘तुमचे लक्ष समोरील बाजूस असायला हवे. परंतु गोलंदाजाच्या कृतीचा विचार करत त्याच वेळी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणेही महत्त्वाचे असते. यशस्वी फलंदाज बनण्यामागचे हेच रहस्य आहे.’’

‘‘फलंदाज म्हणून तुम्ही गोलंदाज काय करत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करता. त्याने चेंडूची कोणती बाजू पकडली आहे, लकाकी असलेली बाजू कोणत्या दिशेला आहे, त्याने चेंडू कशा पद्धतीने पकडला आहे इत्यादी. गोलंदाज उसळी घेणारा चेंडू टाकणार असल्यास थोडा अधिक वेगाने धावतो, चेंडू ‘आउट-स्विंग’ करणार असल्यास तो पुढील हात थोडासा अधिक आतल्या दिशेला घेतो – हे सर्व तुम्ही लक्षात घेता.’’

‘‘मी फलंदाजी करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करत असायचो. मात्र, तुमचा मनावरील ताबा सुटून तुम्ही अहंकार बाळगून विचार करता तेव्हा फलंदाज म्हणून तुम्ही अडचणीत सापडता. गोलंदाजी करत असताना या गोष्टी मला समजल्या.’’

‘‘गोलंदाज म्हणून फलंदाजाला गोंधळात टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. तीन चेंडू बाहेर जाणारे टाकून अचानक एक चेंडू आतल्या दिशेला आणायचा. उसळी घेणारे तीन चेंडू टाकल्यावर क्रीजच्या कोपऱ्यावरून फलंदाजाच्या पायाशी चेंडू टाकायचा. मी हे सर्व प्रयोग नेट्समध्ये सराव करताना करायचो. त्यामुळे सामन्यादरम्यान गोलंदाजाची योजना मला ठाऊक असायची. त्याने अचानक वेगळय़ा प्रकारचा चेंडू टाकल्यास मी गोंधळून जायचो नाही.’’
‘‘मैदानावर उतरल्यानंतर लगेच लक्ष केंद्रित करणे सोपे नसते. परंतु त्या ‘झोन’मध्ये जाण्यासाठी काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. तो ‘झोन’ काय आहे? ती जागा म्हणजे तुमचे अवचेतन मन (सबकॉन्शस माइंड). जिथे तुम्हाला काहीही दिसत नाही, काहीही ऐकू येत नाही – ३० हजार किंवा एक लाख लोकांचा आवाजही. तुम्हाला फक्त गोलंदाज धावताना दिसतो. इतर गोष्टींकडे तुमचे लक्षही जात नाही. तुम्ही समोरील बाजूवर लक्ष केंद्रित केलेले असते. गोलंदाज काय करत आहे यावर.’’

अलौकिक बुद्धिमत्ता असलेला सचिन फार चिंता करत नाही. तो सक्रियपणे माहिती गोळा करत असतो व त्याबाबत विचार करत असतो.
आमच्या या संभाषणानंतर वातावरणात शांतात पसरली आणि त्याच क्षणी सुनील गावस्कर यांच्याशी मारलेल्या गप्पांच्या आठवणी जाग्या झाल्या. एका विशिष्ट पिढीसाठी, तुमची फलंदाजी आणि तुम्ही सर्वोत्तम होतात, असे मी गावस्करांना म्हणालो. गावस्करांनी त्वरित मान हलवून असहमती दर्शवली आणि म्हणाले, ‘‘सचिन, बाप आहे बाप. त्याच्याशी कोणाची तुलनाच होऊ शकत नाही.’’

(‘दि इंडियन एक्स्प्रेस’चे संदीप द्विवेदी आणि श्रीराम वीरा यांनी घेतलेल्या सचिनच्या मुलाखतीमधील संपादित अंश.)