भारतीय हॉकीचा सरदार अशी ओळख असलेल्या सरदार सिंहने नुकताच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आपला ३०० वा सामना खेळला. नेदरलँडच्या ब्रेडा शहरात खेळवण्यात येत असलेल्या हॉकी चॅम्पयिन्स ट्रॉफी स्पर्धेत, अर्जेंटिनाविरुद्ध सरदारने ही मजल मारली. महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताने अर्जेंटीनावर २-१ ने मातही केली. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अर्जेंटिनाने सुवर्णपदकाची कमाई केली होती, त्यामुळे भारतीय संघाने मिळालेला या विजयला एक वेगळचं महत्व प्राप्त झालं आहे.

या सामन्यानंतर सर्वच स्तरातून हॉकी संघाचं कौतुक करण्यात येत होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय संघ आणि सरदार सिंहचं कौतुक केलं. मात्र यावेळी सचिनकडून एक मोठी घोडचूक झाली. वास्तविक पाहता आपल्या ३०० व्या सामन्यात सरदार सिंहला एकही गोल करण्यात यश आलं नाही. भारताकडून मनदीप सिंहने दुसरा गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. सचिनने मनदीप सिंहचा फोटो सरदार सिंह समजून पोस्ट केला. महत्वाची गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरची ही चुक कोणाच्याही लक्षात आली नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.