दर्यापुरातविद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सचिनची बोलंदाजी
मी कारकीर्दीमध्ये कधीच शतकांसाठी खेळलो नाही. बॅट हाती घेतली की, प्रत्येक क्षणी सामना जिंकण्याचाच विचार केला. एखाद्या सामन्यात शतक केले आणि तो सामना हरलो तर समाधान मिळायचे नाही, पण शून्य धावा करूनही सामना जिंकलो तर मात्र आनंद व्हायचा, असे उद्गार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दर्यापूर येथे म्हटले.
दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाच्या महोत्सवी सोहळ्याला सचिनने मंगळवारी हजेरी लावली. विद्यालयाच्या प्रांगणात शुभदाताई वैद्य स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा संकुलाचे भूमिपूजन सचिनच्या हस्ते पार पडले. यावेळी सचिनसमवेत संस्थेचे ट्रस्टी व माजी कसोटीपटू प्रशांत वैद्य सुद्धा होते. भूमिपूजन सोहळ्यानंतर विक्रमादित्य सचिन आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नोत्तरांचा अनोखा सामना रंगला. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मास्टर ब्लास्टरला बेधडक प्रश्न विचारले आणि सचिननेही तेवढय़ाच मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
आपण कित्येकदा शतकांच्या जवळ असताना आऊट झालेत. यावेळी आपली प्रतिक्रिया काय असायची किंवा ड्रेसिंग रूममध्ये तुमचा मूड कसा असायचा?, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने केला. त्यावर उत्तर देताना सचिनने आपण शतकांसाठी कधीच खेळलो नाही, असे म्हटले. मैत्री हीच खरी तुमची गंतवणूक आहे. सुखदु:खात तीच कामी पडेल, असा सल्लाही सचिनने विद्यार्थ्यांना दिला.

.. त्यांच्या टीकेचे  एवढे काय?
बरेचदा माध्यमांमधून तुमच्यावर टीका झाली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असायची?, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने विचारल्यावर सचिन म्हणाला की, टीका होणारच. मी चांगला खेळलो पाहिजे, या भावनेतून टीका होते. सल्ला देणारे प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरही सल्ला देतात, पण ज्यांनी कधी बॅट हाती घेतली नाही, एकही बॉल खेळला नाही त्यांनी लेख लिहून किंवा चॅनलवर चर्चा करून केलेल्या टीकेचे मी कधी दडपण घेतले नाही.

आक्रमकता माझा स्वभाव नाही
माझे वडील मला नेहमी म्हणायचे की, क्रिकेट हा आयुष्यातील एक भाग झाला. दहा वर्षे, पंधरा वर्षे किंवा जास्तीत जास्त वीस वर्षे क्रिकेट खेळशील. त्यानंतर खूप मोठे आयुष्य आहे. सचिन चांगला क्रिकेटर असण्यासोबतच चांगला माणूस आहे, असे कोणी म्हटले, तर त्याचेच समाधान बाळग. वडिलांच्या याच सल्ल्यामुळे माझ्या स्वभावात कधी आक्रमकता आली नाही. तो माझा स्वभावही नाही, पण बॅटिंग करताना अ‍ॅग्रेशन आवश्यक असते, पण ते मैदानापुरतेच.