Sachin Tendulkar Post for Mothers Birthday Arjun Sania Chandok First Time Seen Together: गेल्या काही दिवसांपासून सचिन तेंडुलकर आणि कुटुंबीय चर्चेचा विषय ठरलं आहे. सचिनचा धाकटा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू होती. अर्जुनचा साखरपुडा रवी घई यांची नात सानिया चंडोकबरोबर झाल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर मुलगी सारा तेंडुलकर हिने नवी फिटनेस अकादमी सुरू केली आणि त्याच्या उद्घाटनाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. दरम्यान आता मास्टर ब्लास्टरने त्याच्या आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक साखरपुड्याच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.

सचिनच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरनेही घरी बाप्पाचं आगमन झाल्यानंतर त्याच्या पूजेचा आणि सहकुटुंब आरतीचा केल्याचा व्हीडिओ शेअर केला आहे. तर साराने देखील घरच्या गणपती बाप्पाचे आणि गणेशोत्सवाचे फोटो शेअर केले आहेत.

सचिन तेंडुलकरने संपूर्ण कुटुंबासह आईचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या या पोस्टमध्ये सचिनने मराठीत कॅप्शन लिहिलं आहे. यामध्ये सचिन म्हणाला, “तुझ्या पोटी जन्माला आलो म्हणून मी घडलो. तुझा आशीर्वाद होता, म्हणून मी प्रगती करत राहिलो. तू खंबीर आहेस, म्हणूनच आम्ही सगळे खंबीर राहिलो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!”

सचिन तेंडुलकरच्या आईच्या वाढदिवसाला एकत्र दिसले अर्जुन-सानिया

सचिनने आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये संपूर्ण तेंडुलकर कुटुंबीय उपस्थित आहे. सचिनचे दोन्ही भाऊ, बहिण त्यांचे कुटुंब तर अंजली, सारा आणि अर्जुन आहेत. याचबरोबर सानिया चंडोकदेखील या फोटोमध्ये उपस्थित आहे. तर सचिनची आई खाली खुर्चीवर बसून केक कापताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये मास्टर ब्लास्टर आईला केक भरवताना दिसत आहे. सचिनने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

अर्जुन आणि सानिया यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनंतर सानिया चंडोक अनेकदा तेंडुलकर कुटुंबासह दिसली आहे. सानिया ही साराची चांगली मैत्रिण आहे. त्यामुळे साराने तिच्याबरोबर अनेकदा फोटो शेअर केले आहेत. साराच्या अकादमीच्या उद्घाटनावेळी देखील सानिया उपस्थित होती आणि सचिनने याचे फोटो शेअर केले होते. यानंतर आता सचिनच्या आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील तिच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.