मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने सचिन तेंडुलकरच्या भावनिक निवृत्तीने सर्वाचेच हृदय हेलावले. आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांना निरोप देताना त्याने केलेल्या भाषणाने सर्वाच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे ठाकले. निरोपाच्या भाषणात कोणतेही महत्त्वाचे नाव मला चुकवायचे नव्हते, असे सचिनने सांगितले.
मुंबईतील अखेरचा कसोटी सामना संपल्यावर सचिनने २० मिनिटांच्या भाषणासह सर्वाचा निरोप घेतला. यासंदर्भात सचिनने सांगितले की, पहिल्या कसोटीनंतर कोलकाता ते मुंबई विमानप्रवास करतानाच मी भाषण करायचे निश्चित केले होते.
‘‘कोलकाता येथून मुंबईला परतत असताना मला लक्षात आले की, मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरच्या सामन्याला सामोरा जातो आहे. मी एकटय़ाने बसून विचार केला आणि मला माझ्या वाटचालीत मदत करणाऱ्या व्यक्तींची नावे सुचू लागली. मुंबईचा सामना संपताच माझ्यासमोर तोच भावनिक क्षण जवळ आला,’’ असे सचिनने एका खासगी कार्यक्रमात सांगितले.
‘‘मग संपूर्ण जग मी काय म्हणतोय याची प्रतीक्षा करीत होते. परंतु मला एकही महत्त्वाचे नाव चुकवायचे नव्हते. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. मी सर्वाच्या नावांचा उल्लेख केला आणि बाकीचे सारे माझ्या हृदयातून प्रकटले. मला माहीत होते की, मी भाषणाच्या वेळी भावनिक होईन, म्हणून मी माझ्यासोबत एक पाण्याची बाटली घेतली. परंतु मी भाषण लिहून आणले नव्हते. माझ्या अपेक्षेपेक्षा सारे काही चांगले जुळले,’’ असे सचिनने सांगितले.
‘‘मला निवृत्तीप्रसंगी माझ्या चाहत्यांकडून जे प्रेम मिळाले, ते शब्दांत मांडणे कठीण आहे. लोक मला शुभेच्छा देत होते. हे क्षण माझ्यासाठी खास होते आणि आयुष्यभराचा ठेवा होते. त्यासाठी कोणतीही रंगीत तालीम केली नव्हती. हे सारे काही मनापासून घडले,’’ असे तो पुढे म्हणाला.
निवृत्तीनंतरच्या आपल्या दिवसांविषयी सचिन म्हणाला की, ‘‘निवृत्तीनंतरच्या माझ्या जीवनाचा मी यथेच्छ आनंद लुटत आहे. फक्त माझा मुलगा अर्जुन आणि त्यांच्या मित्रांसोबत मी बऱ्याचदा खेळलो. त्याशिवाय मोठय़ा स्तरावर मला क्रिकेट खेळता आलेले नाही. पण त्याचे आकर्षण मात्र होते.’’
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2014 रोजी प्रकाशित
निरोपाच्या भाषणात महत्त्वाचे नाव चुकवायचे नव्हते – सचिन
मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने सचिन तेंडुलकरच्या भावनिक निवृत्तीने सर्वाचेच हृदय हेलावले. आपल्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांना निरोप देताना त्याने केलेल्या भाषणाने सर्वाच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे ठाकले.

First published on: 03-03-2014 at 06:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar says he didnt want to miss important names in his farewell