Sachin Tendulkar On Cricket Rules: क्रिकेटमध्ये असंख्य नियम आहेत. काही नियम फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतात, तर काही नियम हे गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरतात. काही दिवसांपू्र्वीच आयसीसीने वनडे क्रिकेटमध्ये नवे निमय लागू केले होते. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने रेडिट या वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.यादरम्यान सचिनला, असा कोणता एक नियम आहे जो बदलण्यात यावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. सचिनने क्षणही न दवडता अंपायर्स कॉलचा नियम असं म्हटलं.

गोलंदाज जेव्हा फलंदाजाला पायचित करतात तेव्हा जोरदार अपील केली जाते. मग अंपायर बाद की नाबाद हा निर्णय घेतात. पण जेव्हा गोलंदाज किंवा फलंदाजाकडून डीआरएसची मागणी केली जाते,तेव्हा या निर्णयात अंपायरने दिलेला निर्णय अतिशय महत्वाचा ठरतो. त्यामुळे सचिनने हा नियम बदलण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली.

रेडिटच्या आस्क मी अॅनिथिंग या चर्चेदरम्यान सचिन म्हणाला, “मी डीआरएसमध्ये अंपायर्स कॉलचा नियम बदलू इच्छितो. कारण खेळाडू डीआरएसची मागणी का करतात, कारण ते अंपायर्सने दिलेल्या निर्णयावरून सहमत नसतात. पण डीआरएस घेऊनही अंपायर्सने घेतलेल्या निर्णयाला अधिक महत्व मिळत असेल, तर याला काहीच अर्थ नाही. तंत्रज्ञान थोडं चुकीचं ठरू शकतं, पण ते सतत तसंच चुकीचं राहील.”

सचिनने अंपायर्स कॉलचा नियम बदलण्यात यावा ही मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०२० मध्ये ब्रायन लारासोबत चर्चा करत असताना त्याने हा नियम बदलण्याची मागणी केली होती. जर चेंडू फलंदाजाच्या पॅडला जाऊन लागला आणि अंपायरने फलंदाजाला नाबाद घोषित केलं असेल, मग गोलंदाजाने जर डिआरएस घेतला. तर चेंडू यष्टीला पूर्णपणे लागला असेल तरच त्याला बाद घोषित केलं जातं. जर चेंडू केवळ यष्टीला स्पर्श होऊन जात असेल, तर त्याला अंपायर्स कॉलमुळे नाबाद घोषित केलं जातं. जर अंपायरने बाद घोषित केलं आणि फलंदाजाने डीआरएसची मागणी केली, तर चेंडू यष्टीला केवळ स्पर्श होऊन जात असेल, तरीदेखील त्याला बाद घोषित केलं जातं. सचिनच्या मते अंपायर्स हा नियम क्रिकेटमध्ये नकोच.