भारताविरूद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या. मार्नस लाबूशेनचे शानदार शतक आणि मॅथ्यू वेडची ४५ धावांची खेळी याच्या जोरावर यजमान संघाला पहिल्या दिवशी अडीचशेपार मजल मारता आली. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टी नटराजनने २ बळी टिपले. तर वॉशिंग्टन सुंदरला स्टीव्ह स्मिथच्या रूपात आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी बळी मिळाला. याच बळीच्या जोरावर सुंदरने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पंगतीत स्थान मिळवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- IND vs AUS: लाबूशेनचं दमदार शतक; नवख्या नटराजनचे दोन बळी

वॉशिंग्टन सुंदरला आर अश्विनने कसोटी कॅप प्रदान केली. त्यानंतर सुंदरने पदार्पणाच्या सामन्यातच स्टीव्ह स्मिथला माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कमी वयात बळी टिपणाऱ्या भारतीय फिरकीपटूंच्या यादीत त्याने तिसरं स्थान पटकावलं. या यादीत अव्वल स्थानी सचिन तेंडुलकर तर दुसऱ्या स्थानी दिग्गज माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन हे आहेत. सचिनने १८व्या वर्षी ऑस्ट्रेलियात पहिला बळी टिपला. तर शिवरामकृष्णन यांनी १९व्या वर्षी पहिला बळी टिपला. सुंदरने आज २१व्या वर्षी ऑस्ट्रेलियात आपला पहिला कसोटी बळी टिपला.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनची पहिल्याच कसोटीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी

दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एका धावेवर तर मार्कस हॅरिस ५ धावांवर माघारी परतला. स्मिथदेखील ३६ धावांवर बाद झाला. मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण वेडला अर्धशतक (४५) करता आले नाही. मार्नस लाबूशेनने मात्र ९ चौकारांसह दमदार शतक झळकावलं. तो १०८ धावांवर झेलबाद झाल्यानंतर कर्णधार टीम पेन (२८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३८) या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar washington sundar youngest indian spinner to pick a test wicket in australia list ind vs aus 4th test vjb
First published on: 15-01-2021 at 15:15 IST