चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पंजाब किंग्सवर अखेरीस विजय मिळवला. चेन्नईच्या गोलंदाजांनी १६७ धावसंख्येचा बचाव करत पंजाबचा संघ १३८ धावाच करू शकला आणि चेन्नईने २८ धावांनी सामना जिंकला. या विजयासह चेन्नईने २ गुण मिळवत तिसरे स्थान गुणतालिकेत पक्के केले. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध सलग ५ पराभवानंतर अखेर चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आहे. आयपीएल चॅम्पियन चेन्नईने १६ एप्रिल २०२१ ला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा पराभव केला होता, त्यानंतर आता २०२४ मध्ये विजय मिळवण्यात यश आले.

पजाबच्या एकाही फलंदाजाला सीएसकेच्या गोलंदाजांनी मैदानात फार काळ टिकू दिले नाही. चेन्नईचे तीन मोठे गोलंदाज संघाबाहेर असूनही सीएसकेने गोलंदाजी युनिटच्या जोरावर विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ सहज विजय मिळवेल असे वाटत होते, पण चेन्नईने कमाल केली. चेन्नईकडून दुसऱ्याच षटकात तुषार देशपांडेने दोन विकेट्स घेत पंजाबला धक्के दिले आणि इथूनच संघाने विकेट्स गमावण्यास सुरूवात केली. त्यानंकर जडेजाने पंजाबच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडले.

चेन्नईने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करून देताना दुसऱ्या षटकात संघाने दोन मोठ्या विकेट गमावल्या. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बेयरस्टो (७) आणि राईली रूसो (०) क्लीन बोल्ड झाले. शशांक सिंग (२७) आणि प्रभसिमरन सिंह (३०) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही जडेजाच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकले नाहीत. यासोबतच इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या समरजित सिंगने शानदार गोलंदाजी करत जितेश शर्माला गोल्डन डकवर बाद केले. सॅम करन (७), आशुतोष शर्मा (३)सारखे खेळाडूही मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर आणि रबाडासारख्या गोलंदाजांनी चांगले फटके खेळले पण तोवर सामना हातातून निसटला होता.

चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स, तर तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सँटनर आणि ठाकुरनेही १ विकेट घेत आपले योगदान दिले.

चेन्नईचा संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला. संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नसली तरी फलंदाजांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. चेन्नईकडून सलामीला आलेला अजिंक्य रहाणे ९ धावा करत बाद झाला. तर ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिचेल यांनी पॉवरप्लेमध्ये संघाची धावसंख्या ६० पार नेली. पण त्यानंतर संघाने झटपट विकेट गमावल्या. शिवम दुबेही येताच गोल्डन डकवर झेलबाद झाला. तर जडेजाने मधल्या षटकांमध्ये संघाचा डाव सावरत १५० च्या पार धावसंख्या नेली. जडेजाने २६ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ४३ धावा केल्या.

सँटनर आणि ठाकुरनेही संघाच्या धावांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. पण धोनी गोल्डन डकवर बाद झाल्याने स्टेडियममध्ये शांतता पसरली. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर धोनी क्लीन बोल्ड झाला आणि एकही धाव न करता बाद झाला. पंजाबकडून राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीपने २ आणि सॅम करनने १ विकेट मिळवली.