David Miller Comes Out To Support Struggling Gujarat Titans Captain Shubman Gill : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आयपीएल २०२४ (IPL 2024)च्या ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. गुजरात टायटन्सच्या ११ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा चार गडी राखून पराभव केला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात संघाचे १४७ धावांत सर्व गडी बाद झाले. त्यामुळे गुणतालिकेत गुजरात संघ नवव्या स्थानी घसरला आहे. एकीकडे गुजरातची निराशाजनक कामगिरी आणि दुसरीकडे गिलने गेल्या काही सामन्यांमध्ये न केलेली फलंदाजी, या गोष्टींमुळे शुबमन गिलला आता टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचा कर्णधार अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत गुजरातचा अनुभवी वरिष्ठ फलंदाज डेव्हिड मिलर आता आपल्या कर्णधाराच्या गिलच्या समर्थनार्थ पुढे आला आहे.

मिलर म्हणाला, “गिल हा २४ वर्षीय खेळाडू कर्णधार पदाशी जुळवून घेत असल्याचं दिसतं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गतवर्षीचा उपविजेता आणि २०२२ चा चॅम्पियन टायटन्स संघ गिलच्या नेतृत्वाखाली गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.”

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ आतापर्यंत ११ सामने खेळला असून, संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत; तर सात सामन्यांत पराभवाची नामुष्की स्वीकारली आहे. गुजरात टायटन्स अजूनही ‘प्लेऑफ’च्या शर्यतीत आहे; पण हा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचा – “मी एकटाच नाही; जो…” MI VS KKR सामन्यानंतर मिशेल स्टार्कने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेत डेव्हिड मिलर म्हणाला, “शुबमन हा एक असाधारण खेळाडू आहे. जसे की आपण सर्व जाणतो की, तो अजूनही तरुण आहे. त्याला खूप काही शिकायचं आहे. मला वाटतं की, तो एक महान खेळाडू आहे; पण तो खरोखरच कर्णधारपदाशी जुळवून घेत असल्याचं दिसतं. एकंदरीत सर्व अवघड आहे. कारण, त्रुटी सुधारण्यासाठी आता खूपच कमी वाव आहे.

पायावरील शस्त्रक्रियेमुळे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यंदाचा आयपील सीझन खेळू शकला नाही. त्याला फिट होण्यासाठी अजून काही महिने जातील; पण अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमुळे संघाची कामगिरी खराब झाल्याचेही मिलरने नमूद केले.

मिलर म्हणाला, “नक्कीच शमीने ‘पॉवर प्ले’मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे आम्हाला ‘पॉवर प्ले’मध्ये त्याची उणीव जाणवत आहे. त्याने विकेट घेतल्या आणि इकॉनॉमी रेट कमी ठेवला होता.” दरम्यान, गुजरात टायटन्सचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर होणार आहे. दोन्ही संघ १० मे रोजी अहमदाबादच्या मैदानावर आमने-सामने येतील.