भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या डेन्मार्क खुल्या स्पर्धेकरिता व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याची नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली असून तो वेळेआधी मिळेल, अशी आशा सायनाने व्यक्त केली आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाने आपल्याला व्हिसा मिळवण्यात अडचण येत असून याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मदत करावी, अशी प्रतिक्रिया सोमवारी व्यक्त केली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पुढील सूत्रे हलवत सायनाची व्हिसाची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणी सायनाने परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत. ‘‘शुक्रवारी मी डेन्मार्कला रवाना होणार असून त्याआधी मला व्हिसा मिळेल,’’ अशी आशा आहे, असे सायनाने सांगितले.
‘‘डेन्मार्कचा व्हिसा मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने स्वत: उपस्थित राहणे गरजेचे आहे. दूतावासाच्या सूचनेनंतर व्हिसाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,’’ असे व्हीएफएस ग्लोबलकडून सांगण्यात आले.
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान रंगणार आहे. गेल्या वर्षी सायनाला अंतिम फेरीत चीनच्या ताय झू यिंग हिच्याकडून पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.