शिवानी नाईक – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


मुलाखत
तिला फक्त जिंकणंच माहीत आहे, तर त्याला बॅडमिंटनचा बारकाईने अभ्यास करायला आवडतो. तिला बॉलीवूडचे सिनेमे आवडतात, तर त्याला गंभीर सिनेमे आवडतात. एकमेकांपेक्षा अगदी विरुद्ध स्वभावाच्या आणि तरीही एकमेकांच्या प्रेमात पडून नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्याशी गप्पा.

लग्नाच्या रिसेप्शनला अडीच हजार लोकांच्या समोर एकाच ठिकाणी उभं राहून सतत हसतमुख राहणं हे सायना आणि पारुपल्ली कश्यपला बॅडमिंटन कोर्टवरच्या एखाद्या सामन्यासारखंच वाटत होतं; स्टेजवर जाईपर्यंत ते दोघेही एकदम मजेत होते; पण रिसेप्शनसाठी स्टेजवर पोहोचल्यावर त्यांचं त्यांना समजलं की, हा त्यांच्या कोर्टातला चेंडू नाही. कश्यप तर ताबडतोब त्याच्या मित्राला, गुरूला शरण गेला.

गुरू साई दत्त हा त्या दोघांचाही जुना आणि खूप घट्ट मित्र. ही जोडी ज्यांच्याबरोबर असताना अवघडत नाही अशा मित्र-मैत्रिणींचा ग्रुपच त्याने सतत स्टेजवर त्यांच्याभोवती ठेवला. या मित्र-मैत्रिणींनीच गेली १३ र्वष चाललेलं या दोघांच्या नात्यातलं खासगीपण जपायला मदत केली होती.

एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळा स्वभाव असलेल्या सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या जोडीशी गप्पा मारताना त्यांच्या नात्यातले असे अनेक पैलू पुढे आले. आपल्यामधला विरोधाभास सांगताना कश्यप सांगतो, ‘मला अशा कार्यक्रमांमध्ये जाणं, उभं राहून हातात डिश घेऊन खाणं, खाता खाता गप्पा मारणं अजिबात जमत नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमानंतर मी भुकेलेलाच रहायचो.’ यावर सायना हसून सांगते, ‘मी दहा मिनिटांत खाणं संपवायचे आणि त्याला तासभर लागायचा आणि एरवी हा टाइम मॅनेजमेंटच्या बाता करतो.’

खेळावरच लक्ष केंद्रित करायचं असल्यामुळे ते आजवर कधीच कुठेच एकत्र उपस्थित राहिले नाहीत. अगदी २०१२ च्या ऑलिम्पिकच्या आधी ‘इंडियन एक्स्प्रेस’साठी फोटो शूट केलं तेव्हाही त्यांनी त्यांचे प्रशिक्षक पुलैला गोपीचंद यांना दोघांच्यामध्ये ओढून आणून उभं केलं होतं. ते तिघंही कॅमेऱ्याकडे बघत हसत उभे होते अणि त्यांच्या मनात मात्र कधी फोटो सेशन आटोपून बॅडमिंटन कोर्टावर जातोय हे भाव होते.

कश्यप सांगतो, ‘सायनाचं चांगलं छायाचित्र हवे असेल तर ती टॉप टेनच्या यादीतील एखाद्या खेळाडूला हरवून बॅडमिंटन कोर्टाबाहेर पडत असेल तेव्हा तिला गाठावं.’ तेव्हा ती इतकी आनंदी असते, की अशाच एका वेळी तिने कश्यपला आपलं हृदय दिलं आणि त्याच्या मनात मात्र त्या वेळी जणू आपण त्या वर्षांतली सर्वोत्तम मॅच जिंकली आहे, अशीच भावना होती. ‘लग्न हीसुद्धा माझ्यासाठी आयुष्यातली सर्वोत्तम मॅच आहे. याबद्दल तिला काय वाटतं ते मला माहीत नाही.’ कश्यप म्हणतो.

सायना भेटण्याआधीपर्यंत गर्लफ्रेण्ड, रिलेशनशिप याबद्दलची त्याची मतं त्याचे प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडू यांच्यासारखीच होती. ते या मुलांना सतत या बाकी सगळ्या गोष्टी टाळून खेळावर लक्ष केंद्रित करायला सांगायचे. फक्त खेळ, खेळ आणि खेळ.. कश्यप सांगतो, ‘आम्ही दोघांनी एशियन, वर्ल्ड ज्युनियर्स टुर्नामेंट्स एकत्र खेळायला सुरुवात केली. एका टुर्नामेंटदरम्यान माझ्या लक्षात आलं की, ती माझ्याशी विचित्र वागतोय. मी तिला त्याबद्दल विचारलं तर ती म्हणाली, की तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोस. मी तिला सांगितलं की, ते काही जाणीवपूर्वक नव्हतं. त्यानंतर मला असं वाटलं, की ती तिला मी आवडतो हे सुचवण्याचा प्रयत्न करते आहे. ती ते थेट सांगू शकत नव्हती; पण मला समजत होतं.’

‘आम्ही कायमच एकमेकांबरोबर असायचो. त्यामुळे आम्ही एकमेकांना प्रपोज वगैरे कधीच केलं नाही. आम्ही खूप जवळचे मित्र झालो. सिनेमातल्यासारखंच वाटत होतं आम्हाला. आम्ही एकमेकांची प्रत्येक गोष्ट इतकी गांभीर्याने घेऊ असं कधीच वाटलं नव्हतं.’ सायना सांगते. ‘आम्ही आमच्या नात्याचं भविष्य काय असेल वगैरे विचार करत नव्हतो. तेव्हा ते नातं फक्त गर्लफ्रेण्ड, बॉयफ्रेण्ड टाइपचं होतं.’

पण हे नातं एरवीच्या गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डच्या ठरावीक साच्यातल्या नात्यासारखं नव्हतं. कारण या मुलीला प्रेमाच्या नात्यात या मुलाला जिंकायचंही होतं आणि बॅडमिंटन कोर्टावर त्याला हरवायचंही होतं. ते सगळं कश्यपला आजही अविश्वसनीय वाटतं.

सायना : प्रशिक्षणाच्या काळातही आमच्यात स्पर्धा चालायची.

कश्यप : मी तिच्याशी स्पर्धा करत नसायचो; पण ती जगातल्या प्रत्येकाशी स्पर्धा करायची, अगदी माझ्याशीही.

सायना : हो मी करायचे स्पर्धा. मला जे जे करायचं होतं ते याच्यापेक्षा चांगलं करायचं होतं.

कश्यप : २००५ मध्ये म्हणजे आमच्यातलं हे नातं सुरू झालं त्या काळात मी इंदौरमध्ये एक टुर्नामेंट जिंकली. ती मात्र फायनलमध्ये हरली. ती माझी गर्लफ्रेण्ड होती. त्यामुळे ती हरली याचं मला वाईट वाटत होतं आणि मी जिंकलो याचं तिला वाईट वाटत होतं. मी जिंकलो आणि ती हरली एवढय़ा कारणासाठी ती माझ्याशी बोलत नव्हती. कुणाला तरी खरं वाटेल का हे?

सायना : तो जिंकलेला मला आवडलं नाही असं नाही, पण स्पर्धेची भावना माझ्यात प्रचंड आहे.

कश्यप : खेळाडूंना त्यांच्या जिंकण्याच्या इच्छाशक्तीनुसार रेटिंग द्यायचं असेल तर हा पॉइंट मला घेतलाच पाहिजे, मी शटल अजिबात देणार नाही, या अ‍ॅटिटय़ूडमुळे सायना जगात नंबर वन असेल आणि नंबर दोन तिच्यापासून खूप लांब असेल. ही वृत्ती तुमच्यात जन्मजात असते किंवा नसते. ती निर्माण नाही करता येत. तुम्ही सतत सराव करून शारीरिकदृष्टय़ा कणखर होऊ शकता. तसे तुम्ही शारीरिकदृष्टय़ा कणखर नसाल तर तुमचं शरीर साथ देत नाही; पण पाय दुखणं, फुप्फुसांना त्रास होणं वगैरे गोष्टी व्हायला लागतात.

सायना : तो किती तरी मॅचेसजिंकू शकत होता; पण तो त्या हरला आहे. तो कोणत्याही सर्वोत्तम खेळाडूला हरवू शकतो; पण मी त्याला ३-४ पॉइंट्स उरलेले असताना हरताना बघितलं आहे. कोणताही खेळाडू असं करू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. तो अगदी सहजपणे त्याची मॅच समोरच्याला भेट देऊ शकतो. हे मला अजिबात आवडत नाही.

सायनामध्येही अशा काही गोष्टी आहेत, ज्या कश्यपला अजिबात आवडत नाहीत. उदाहरणार्थ तिचं बॉलीवूड प्रेम. ‘‘मी एकदम फिल्मी आहे.  बॉलीवूडप्रेमीच आहे. तर तो आयुष्याबद्दल एकदम गंभीर, वास्तववादी आहे. मी तर सिनेमात दाखवतात तसं वस्तू त्याच्यावर फेकून मारतेसुद्धा.’’ सायना हसत सांगते. ‘‘इंग्लिश सिनेमात असतं ना खूप गंभीर, इंटेन्स चर्चा करणारा.. तसा आहे तो. मी एखादा जोक केला तर साधा हसतही नाही तो. मेडिटेशन आणि सखोल चर्चा हे त्याचं सध्याचं फॅड आहे. त्यामुळे तो खरं तर आधीपेक्षा जास्तच बोअर झाला आहे. तो आधी असा नव्हता, तो खूप बदलला आहे.’’

कश्यप : ती करते ती भांडणंही फिल्मी असतात. तरीही आम्ही इतकी र्वष का एकत्र आहोत माहीत आहे? कारण मी तिच्या भांडणांना जराही खतपाणी घातलं नाही आणि ती वाढू दिली नाहीत. आणि बॉलीवूड या विषयावर तर आमचं  एकमेकांशी अजिबात पटत नाही.

सायना : तेवढा एकच मुद्दा आहे, ज्याच्याबाबत आमचं एकमेकांशी पटत नाही; पण बॉलीवूडशिवाय आयुष्य किती बोअर झालं असतं..

कश्यप : पण त्याच्याशिवाय ते एकदम आनंदीही झालं असतं. अर्थात असं नाहीये की, मला बॉलीवूड आवडत नाही. ते सगळं खूप छान आहे, सुंदर आहे, पण मला ते तेवढं मजेदार वाटत नाही. मला संवेदनशील, आशयघन सिनेमे आवडतात.

आणि तरीही कश्यपला सायना आवडते. ‘आवडते’ एवढय़ा एकाच शब्दातून त्यांच्या नात्याबद्दल सगळं काही सांगता येणार नाही. त्यांनी नुकतंच लग्न केलं असलं तरी गेली १३ वर्षे ते एकमेकांबरोबर आहेत. एखाद्या आरशात एकमेकांचं प्रतिबिंब पहावं तसं एकमेकांना गेली १३ वर्षे पाहात आहेत. ‘त्याचं रोजचं सगळं जगणं माझ्याभोवतीनेच असतं,’ सायना सांगते. ‘तो २४ तास माझा खेळ, माझे प्रश्न, माझा ताण याच्याबद्दलच विचार करत असतो; पण त्याच्या ताणतणावात मात्र त्याला माझी अजिबात मदत होत नाही. अर्थात तोही मला कधी त्याच्यावर खूप ताण आहे, त्याला माझी मदत हवी आहे, असं सांगत नाही. त्याला त्याच्या खेळात काही सुधारणा करायच्या असतील, त्यासाठी चर्चा करायची असेल तर मी ती करते. बाकी त्याला असंच वाटत असतं, की हिला आयुष्याबद्दल फारसं काहीच माहीत नाही.’’ तिचं हे बोलणं ऐकून काय चुकीचं बोलते ही अशा अर्थाने कश्यप मान हलवतो.

सायना सांगते, ‘‘कदाचित यामागचं कारण असं असेल, की मी अजूनही बालिशपणे वागू शकते. मी दुसऱ्यांसाठीचे मोठे निर्णय घेऊ शकत नाही. मी इतर कुणालाही त्यांच्या ताणतणावातून बाहेर काढू शकत नाही. समोरचा माणूस रडत असेल आणि मी त्याला मदत करायला गेले तर मी त्याला आणखी निराश करेन. मला अशा परिस्थितीवर नियंत्रण आणायला अजिबात जमत नाही. इतरांना ते चुकीचं वाटत असेल; पण त्यांना हेही माहीत आहे, की सायना मनाने वाईट नाही, फक्त ती समोर जे दिसतं तेच बोलते.’’

कश्यपमुळे आपल्याला आयुष्यात नेमकं काय मिळालं आहे हे सायनाला नीट माहीत आहे. त्याच्या पाठिंब्यामुळे तिची यशाकडची वाटचाल अधिक सुकर झाली आहे. ‘गेल्या तीन-चार महिन्यांत मला जाणवलं, की माझ्यामधली सकारात्मक बाजू फक्त तोच बाहेर आणू शकतो. एरवी मी फार नकारात्मक, निराशावादी आहे. कोणत्याही बाबतीत मी एकदम ढ आहे. मी कशातच सर्वोत्तम नाही, मी फक्त खूप मेहनत घेते. त्याउलट तो प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू बघतो. तो माझ्यामधलंही सकारात्मक आहे ते बाहेर आणतो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधीही तो सांगायचा, तू भारी आहेस, मोठं यश मिळवण्यासाठी स्वत:शीच संघर्ष कर.’’

‘‘ती आपण जे काही करतो ते एन्जॉय करणारी नाहीये. तिला यशस्वीच व्हायचं होतं. म्हणजे तिचा बॅडमिंटनवर फार जीव आहे असं काही नाहीये. तिला फक्त जिंकायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे. ती इतर कुठल्याही क्षेत्रात गेली असती तरी अशीच यशस्वी झाली असती. आता ती इथे आहे, तर तिला फक्त जिंकायचं आहे. आज देशात जे टॉपचे खेळाडू आहेत, त्यातल्या काही जणांचं या खेळावर फार प्रेम आहे. त्याचा त्यांचा चांगला अभ्यास आहे; पण ती अशा गोष्टींमध्ये अजिबात पडत नाही. जिंकायचं कसं ते सांगा, मी जिंकून दाखवते, एवढंच तिचं म्हणणं असतं.’’ कश्यप सांगतो.

‘‘अगदी बरोबर आहे त्याचं म्हणणं..’’ सायना म्हणते. ‘‘मला बॅडिमटनच आवडतं असं काही नाही; पण जिथे असेन तिथे टॉपवर असायचं आहे.’’

सायनाला मॅच जिंकण्याव्यतिरिक्त बॅडमिंटनबद्दल बाकी फारसं काहीही माहीत नाही; पण प्रशिक्षकांना अशी कोरी पाटीच आवडत असते. अर्थात या सगळ्यातून वर येऊन सायना जिंकत असते हे कश्यपला खूप भारी वाटतं. तो सांगतो, ‘‘बॅडमिंटन हेच तिचं आयुष्य आहे. ती मलाही सतत त्याबद्दलच अनेक गोष्टी सांगत असते, प्रोत्साहन देत असते. तू अमुक करताना आणखी मेहनत घ्यायला हवी होतीस वगैरे गोष्टी तिच्या सुरू असतात. आमच्या रोजच्या जगण्यात फक्त खेळाचेच विचार असतात. बाकी काहीही नाही.’’

सायना लगेच सांगते, ‘‘खेळाच्या पातळीवर याला माझी काहीच गरज नाही. तो सकारात्मक आहे. नकारात्मक विचार तर मी करते. नशिबाने, योगायोगाने मला यश मिळालं आहे. याच्या बाबतीत मात्र तसं नाही. खेळात, आयुष्यात तो जे काही करतो ते परफेक्टच असतं. मी त्याच्या एकदम विरुद्ध आहे.’’

प्रशिक्षक गोपीचंद पुरेसे वैयक्तिक लक्ष देत नाहीत, असा विचार करून २०१४ मध्ये सायना हैदराबाद सोडून बंगलोरला विमल कुमार यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला गेली; पण त्याचा दुसरा अर्थ होता गोपीचंद यांच्या अ‍ॅकॅडमीत असलेल्या कश्यपला सोडून जाणं. त्याबद्दल सायना सांगते, ‘‘माझ्या आयुष्यात नेहमीच बॅडमिंटनला प्राधान्य आहे आणि यापुढेही तसंच राहील. कश्यपने ते तेव्हा समजून घेतलं.’’

कश्यप हा गोपीचंद यांच्या पहिल्या बॅचपैकी एक. त्याचा गोपीचंद यांच्यावरच पूर्ण विश्वास होता. सायनाचा हा निर्णय चुकीचा आहे असंच त्याला वाटत होतं. ‘‘मी तिचा समज दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण काहीच उपयोग झाला नाही. तिला जायचंच होतं. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींची अशी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप बघितली होती. त्यामुळे आमच्या नात्यावरही याचा परिणाम होणार आहे हे मला माहीत होतं.’’ कश्यप सांगतो.

आपलं जागतिक विजेतेपद का हुकलं याचा शोध घेण्यासाठी सायनाला असं बंगलोरला जाणं आवश्यक वाटत होतं. तिच्या निर्णयावर ती ठाम होती. तिला तिच्या निर्णयामुळे तो किती अस्वस्थ झाला आहे ते जाणवत होतं; पण तिला हैदराबादमध्ये आपल्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. त्यामुळे त्यापासून तिला लांब जायचं होतं. ती सांगते, ‘‘माझ्या अशा जाण्याचं त्याला वाईट वाटलं हे मला माहीत आहे; पण मला जाणं भाग होतं. त्याचा आमच्या नात्यावर परिणाम होईल असा विचार मी केला नाही.’’

कश्यपला मात्र तिच्या जाण्याचा खूप त्रास झाला. तो सांगतो, ‘‘आम्ही दहाएक र्वष सतत एकत्र होतो आणि अचानक ती निघून गेली.’’ सायना तिला जे करायचं असेल त्याबाबत अशीच ठाम आणि कठोर होती.

त्याचं मात्र असं नव्हतं. ‘‘घरी राहण्यापेक्षा मला राष्ट्रीय शिबिरांमध्ये राहायला आवडायचं. त्याच दरम्यान माझी बहीण गेली, त्यामुळे मी आई-वडिलांकडे राहायला गेलो. एरवी मला मित्रांबरोबर असणंच आवडायचं. मी अगदी सगळं आयुष्यदेखील राष्ट्रीय शिबिरात काढू शकलो असतो.’’ तो सांगतो.

त्याउलट सायनाचं प्रशिक्षण आणि स्पर्धाच्या पातळीवरचं आयुष्य एका सरळ रेषेतलं, पण यशस्वी. तिच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींना काहीच स्थान नव्हतं आणि तिच्या आयुष्यातली सगळी मौजमजा फक्त बॅडमिंटन कोर्टाच्या चौकोनात होती. ती प्रशिक्षणाशिवायच्या काळात घरीच असायची. ‘‘तिला असं घरी असणं काय आवडतं ते मला माहीत नाही; पण तिला मित्रमैत्रिणींची कधीच गरज वाटत नाही. केवळ माझ्यामुळे आता तिला काही मित्र-मैत्रिणी आहेत. नाही तर ती फक्त घरीच असली असती आणि तिची माझ्या एकटय़ाशीच काय ती मैत्री असली असती.’’ कश्यप सांगतो.

‘‘मी माझा सगळा दिवस एकटीच माझ्या खोलीत बसून घालवू शकते.’’ ती सांगते, तर तो म्हणतो, ‘‘हो मीही घालवू शकतो, पण त्या खोलीत मला माझे सगळे मित्र-मैत्रिणी हवे असतात.’’

आपल्या मनातलं विचारांचं वादळ रितं करायला सायनाला एखादा माणूस हवा असतो. बॅडमिंटन कोर्टात ती व्यक्ती म्हणजे तिचे प्रशिक्षक तर घरी तिचे वडील आणि कश्यप यांचं ते काम आहे. ‘‘मला एखादी गोष्ट खटकली, तिचा त्रास व्हायला लागला, की मला माझे वडील किंवा कश्यप असं कुणी तरी हवं असतं. मी ते सगळं त्यांना सांगते. मग ते सगळं माझ्या डोक्यातून जातं आणि मी मोकळी होऊन जाते.’’ सायना सांगते. कश्यप मात्र सांगतो, की तिच्या सतत सुरू असलेल्या अशा किरकिरीला मी काहीच प्रतिसाद देत नाही.

‘‘हो, तो काहीच प्रतिक्रिया देत नाही. माझे वडीलही देत नाहीत. ते म्हणतात, ठीक आहे बेटा, तुला जे बोलायचं आहे ते बोलत राहा. मग मी मनातलं बोलून टाकते आणि एकदम ठीकठाक होऊन जाते.’’ ती सांगते.

कधीकधी एखाद्या आवेशात ती एखादा निर्णय घेऊन टाकते तेव्हा कश्यपला धक्का बसतो. तो सांगतो, ‘‘एखाद्या गोष्टीची निवड करायची असेल तेव्हा मी भयंकर गोंधळून जातो. तिला मात्र एकदम स्पष्टता असते. तिने एखादा चुकीचा, वाईट निर्णय घेतला तरी ती त्याच्यावर ठाम असते आणि तो निर्णय बरोबरच आहे असं आपल्यालाही वाटायला लागतं. माझ्या अनिश्चिततेला ती फार वैतागते.’’

‘‘लग्नामुळे आमच्या नात्यात फारसा काही काहीच फरक पडत नाही. अगदी विमानात बसल्यावरदेखील आम्ही जेमतेम पाच मिनिटं एकमेकांशी बोलतो आणि उरलेला सगळा वेळ गेम खेळत बसतो किंवा वाईटसाईट बोलून एकमेकांना त्रास देत बसतो. मी एरवी इतर कुणाला बोलणार नाही ते सगळं टाकून बोलणं कश्यपला बोलते.’’ सायना सांगते.

असं हे जोडपं. बॅडमिंटनच्या कोर्टावरची कारकीर्द यशस्वी करून आता आयुष्याच्या कोर्टातली मॅच खेळायला सिद्ध झालं आहे.
(अनुवाद- वैशाली चिटणीस)
(संडे एक्स्प्रेसच्या एक्स्प्रेस आय पुरवणीतून)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal
First published on: 25-01-2019 at 01:02 IST