भारतासाठी खेळण्यालाच माझे प्राधान्य असेल, असे मत बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले. व्यावसायिक कारणांसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करायला नकार देणाऱ्या क्रीडापटूंना सरकारी निधी उपलब्ध होणार नाही असा फतवा क्रीडा मंत्रालयाने काढला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सायना बोलत होती.
‘‘प्रत्येकाला भारतासाठीच खेळायचे असते. तिरंग्याचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही भारतीय क्रीडापटूंसाठी अभिमानास्पद गोष्ट असते. दुखापतींमुळे काही वेळा खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येत नाही. मात्र हे तांत्रिक कारण आहे. अन्यथा प्रत्येक क्रीडापटूला देशाचेच प्रतिनिधित्व करायचे असते’’, असे सायनाने सांगितले.  
एटीपी स्पर्धेद्वारे मिळणारे क्रमवारीचे गुण पटकावण्यासाठी लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा आणि सोमदेव देववर्मन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. या तिघांच्या अनुपस्थितीत भारताला दुय्यम दर्जाचा संघ पाठवावा लागला. देशासाठी खेळणे आणि घसघशीत बक्षीस रक्कम देणाऱ्या स्पर्धामध्ये खेळणे यांचा समन्वय साधणे किती कठीण आहे असे विचारले असता सायना म्हणाली, ‘‘बक्षीस रक्कम मिळणाऱ्या स्पर्धामध्ये तुम्ही केवळ खेळाडू म्हणून सहभागी होत नाही. आम्ही सुरुवातीला राज्यासाठी खेळतो. त्यानंतर राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होतो आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही भारतासाठीच खेळतो. यामध्ये बक्षीस रक्कम किंवा पदकाचा मुद्दाच नसतो. भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे.’’
सायना पुन्हा अव्वल पाचमध्ये
नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवालने एका स्थानाने बढती मिळवत जागतिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावले आहे. डेन्मार्क आणि फ्रेंच सुपरसीरिज स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारत सायनाने आगेकूच केली आहे. युवा पी.व्ही.सिंधूने दहावे स्थान कायम राखले आहे. पारुपल्ली कश्यपने चार स्थानांनी सुधारणा करत १७वे स्थान गाठले आहे. किदम्बी श्रीकांत १६व्या स्थानी स्थिर आहे.