गतविजेती सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी इंडिया ओपन सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत महिला गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, पुरुष गटात गतविजेत्या श्रीकांत किदम्बीला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या तिआन हुवेईने २१-१३, १७-२१, २४-२२ अशा फरकाने श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने तन्वी लाडवर २१-७, २१-१३ असा विजय मिळवला, तर रितुपर्णाने २१-१८, २१-१५ अशा फरकाने अरुणा प्रभुदेसाईवर विजय मिळवला. पी.व्ही. सिंधूने इटलीच्या जेइन सिसोगनीवर २१-८, २१-८ असा धुव्वा उडवला.
पुरुष गटात बी. साई प्रणितला पराभवाचा धक्का बसला. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पध्रेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चाँग वेईवर धक्कादायक विजय नोंदवणाऱ्या प्रणिथला इंडोनेशियाच्या सोनी द्वी कुकोंरोने २०-२२, १३-२१ असे नमवले. जर्मनीच्या मार्क झ्विब्लेरने २१-१२, १३-२१, २१-१९ अशा फरकाने अजय जयरामला स्पध्रेबाहेर केले. पुरुष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवलकर या जोडीने अर्जुन कुमार रेड्डी मलगारी व संतोष रावुरी या जोडीचा २१-१७, २१-१६ असा पराभव केला. मनू अत्री व सुमीत रेड्डी या जोडीने विजयी आगेकूच करताना विनिथ मॅन्युएल आणि एस. संजीथ यांचा २१-१३, २१-१३ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पासह खेळताना मनूने २१-७, २१-३ अशा फरकाने कपिल चौधरी व स्मृती नागरकोटी जोडीवर विजय मिळवला. प्रणव व सिक्की रेड्डी यांनीही अटीतटीच्या सामन्यात कोरियाच्या सोलग्यू चोई व इओम हे वोन जोडीचा २१-१७, १७-२१, २१-१४ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2016 रोजी प्रकाशित
श्रीकांत बाद; सायना दुसऱ्या फेरीत
गतविजेती सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी इंडिया ओपन सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत महिला गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

First published on: 31-03-2016 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal p v sindhu