यंदाच्या टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू सॅम करन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. इंग्लंडने २०१० मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला. सॅम करन आयपीएल २०२१मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळत होता. शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याने वेदना झाल्याची तक्रार केली. त्यामुळे तो आयपीएल २०२१मधूनही बाहेर पडला आहे.

इंग्लिश संघाला हा झटका आणखी मोठा आहे, कारण अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आधीच टी-२० विश्वचषक संघात नाहीत. स्कॅन केल्यानंतर करनच्या दुखापतीची माहिती मिळाली. तो लवकरच घरी परतेल. यानंतर ईसीबीची वैद्यकीय टीम त्याची तपासणी करेल. त्याच्या जागी त्याचा भाऊ टॉम करनला संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा – “भारत हा खालच्या दर्जाचा संघ, त्यांना माहितीय की…”, पाकिस्तानच्या अब्दुल रझ्झाकची मुक्ताफळं

आयपीएलचा यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरला संपणार असून १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २३ वर्षीय सॅम करनने इंग्लंडसाठी आत्तापर्यंत २४ कसोटी, ११ वनडे आणि १६ टी२० सामने खेळले आहेत. तसेच चेन्नईसाठी करनने २०२१ हंगामात ९ सामने खेळले असून ९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने गेल्यावर्षी चेन्नईसाठी अष्टपैलू कामगिरी करताना १४ सामन्यांत १८६ धावा केल्या होत्या आणि १३ विकेट्स घेतल्या होत्या.