सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक जोडीने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. भारताचा अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस आणि त्याचा साथीदार राडेक स्टेपानेकला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पाचव्या मानांकित सानिया-कॅरा जोडीने द्वितीय मानांकित इकेटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निना जोडीवर ६-४, ६-१ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर ल्युसी राडेका आणि जि झेंग जोडीचे आव्हान असणार आहे. दरम्यान बिगरमानांकित रॉजर फेडरर आणि स्टॅनिसलॉस वॉवरिन्का जोडीने चौथ्या मानांकित पेस-स्टेपानेक जोडीवर ६-३, ६-७, १०-४ असा विजय मिळवला. पेस-स्टेपानेक जोडीला तीनपैकी केवळ एकाच ब्रेकपॉइंटचा उपयोग करून घेता आला. उपांत्य फेरीत फेडरर-स्टॅनिसलॉस जोडीसमोर अलेक्झांडर पेया आणि ब्रुनो सोरेसचे आव्हान असणार आहे. पेस पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारतीय पुरुष टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळताना रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.