भारताची सानिया मिर्झा हिने जागतिक टेनिस क्रमवारीमधील महिलांच्या दुहेरीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तिने मार्टिना हिंगीस हिच्यासह नुकतेच बीएनपी पारिबास चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. रॉबर्टा व्हिन्सी व सारा इराणी या दोन्ही इटलीच्या खेळाडूंनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळविले आहेत. सानियाचे ६ हजार ८८५ गुण झाले आहेत. पारिबास स्पर्धेतील विजेतेपदामुळे तिला एक हजार मानांकन गुणांची कमाई झाली. एकेरीत भारताच्या अंकिता रैना हिने २५३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. पुरुषांच्या एकेरीत सोमदेव देववर्मन याने १७६ वे स्थान राखले आहे, तर रामकुमार रामनाथन याने २५७ व्या स्थानावरून २४७ व्या स्थानावर मजल गाठली आहे. युकी भांब्री २५७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुहेरीत लिअँडर पेस  २५ व्या क्रमांकापर्यंत खाली घसरला.