Sanju Samson Statement on Gautam Gambhir: संजू सॅमसन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मोठा विषय आहे. संजू आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्स सोडून चेन्नई सुपर किंग्स संघात जाणार असल्याची मोठी चर्चा आहे. यादरम्यान अश्विनच्या पोडकास्टमधील त्याचे काही व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यामधील सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हीडिओदेखील समोर आला आहे.
संजू सॅमसनकडे सध्या भारतीय टी-२० संघाचा सलामीवीर आहे. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला टी-२० संघात संधी मिळाली होती. आता संजू सॅमसनने आर. अश्विनशी झालेल्या संभाषणात सांगितले की त्याला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय कसा घेण्यात आला. यादरम्यान त्याने सूर्यकुमार यादव आणि गंभीरने कसा पाठिंबा दिला; याबद्दलही सांगितलं.
सॅमसन आणि कर्णधार सूर्या यांच्यात त्याच्या सलामीवीर भूमिकेबाबत चर्चा झाली. संजू म्हणाला, “मी आंध्रामध्ये दुलीप ट्रॉफी खेळत होतो. सूर्या पण तिथे खेळत होता. तितक्यात तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की, तुझ्यासाठी एक चांगली संधी येतेय. संघाला येत्या काळात ७ सामने खेळायते आहेत आणि सलामीवीर म्हणून तू सातही सामने खेळणार आहे. कर्णधाराकडून अशा पद्धतीने आत्मविश्वासाने आपल्याला सांगणं खूप मोठी गोष्ट असते.”
संजू सॅमसनचा गंभीरबाबत मोठा खुलासा
श्रीलंका दौऱ्यात संजू सलामीला उतरला पण दोन सामन्यात तो शून्यावर बाद झाला. यामुळे तो काळजीत पडला होता, त्यानंतर गंभीरने त्याला पाठिंबा दिला. संजू गंभीरबद्दल बोलताना म्हणाला, “श्रीलंकाविरूद्धच्या मालिकेत मी दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झालो. मी यानंतर खूप निराश झालो होतो. तितक्यात गौतम गंभीरने मला पाहिलं आणि ते माझ्याजवळ आले, मला विचारलं, काय झालं? तुम्ही दिलेल्या संधीचं मी सोनं करू शकलो नाही असं मी कोचला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, २१ वेळा शून्यावर बाद झालास तरच संघातून वगळेन.”
गंभीरच्या या विधानाने सॅमसनला खूप धीर मिळाला. तो म्हणाला, कर्णधाराचा, प्रशिक्षकाचा असा विश्वास आणि पाठिंबा मोलाचा असतो. त्यांनी पडत्या काळात साथ दिली म्हणूनच नंतर मी मोठ्या खेळी साकारू शकलो. संजू सॅमसनचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.