Sarfaraz Khan Century at Buchi Babu 2025: भारताचा विस्फोटक फलंदाज सर्फराझ खानने मुंबईकडून खेळताना जबरदस्त शतक झळकावलं आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत सर्फराझची संघात निवड झाली नव्हती. इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अनेक युवा खेळाडूंनी संधी देण्यात आली होती. पण सर्फराझ खानला मात्र या संघातून वगळण्यात आलं. सर्फराझने आता संधी मिळताच शानदार शतक झळकावलं आहे.
सर्फराझ खानने बूची बाबू स्पर्धेत खेळताना शानदार शतक झळकावलं आहे. बूची बाबू स्पर्धेला सुरूवात झाली आहे. ही स्पर्धा तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनद्वारे १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटात विभागण्यात आले आहे.
बूची बाबू स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचा स्टार फलंदाज सर्फराझ खानने शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीएनसीएविरुद्ध फलंदाजी करताना सर्फराझ खानने शानदार शतकी खेळी खेळली आणि संघाचा डाव सावरला.
सर्फराझ खानने शतकासह सावरला मुंबईचा डाव
सर्फराझ खानने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावलं आहे. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा मुंबईने ९८ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर सर्फराझ खानने संघाचा डाव सावरला आणि वादळी शतक झळकावलं. सर्फराझ फक्त ९२ चेंडूत १०० धावांचा टप्पा गाठला. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि ३ षटकारही लगावले.
सर्फराझ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. टीम इंडियामध्ये निवड न झाल्याने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली. सर्फराझ खानने फक्त दीड महिन्यात सुमारे १७ किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. वजन कमी केल्यानंतर हा त्याचा पहिलाच सामना आहे आणि या सामन्यात तो आपली छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे. सर्फराझ खान आता वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या घरच्या कसोटी मालिकेत आपले स्थान निश्चित करण्यावर त्याच्या नजरा आहेत.
सर्फराझ खानचा धाकटा भाऊ मुशीर खान हा देखील या स्पर्धेत मुंबई संघाचा भाग आहे. पण या स्पर्धेच्या सुरुवातीच्या डावात तो काही खास कामगिरी करू शकला नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात मुशीर खानला ७५ चेंडूंत फक्त ३० धावा करता आल्या. मुशीर खानने सुरूवात केली पण तो मोठ्या खेळीत त्याचं रूपांतर करू शकला नाही.