India Tour of England: भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे टीम इंडिया ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अचानक कसोटी निवृत्तीनंतर भारतीय संघ निवडणं हे निवडकर्त्यांसाठी मोठं आव्हान असणार आहे. त्याआधी, भारत अ संघाला इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनौपचारिक चार दिवसीय सामने खेळायचे आहेत. बीसीसीआयने नुकतीच या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.
भारताच्या अ संघात निवड झालेल्या एका भारतीय खेळाडूने इंग्लंड दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या खेळाडूने आपल्या तब्बल १० किलो वजन कमी केलं आहे आणि त्याने सरावही दुप्पट केला आहे. गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही टीम इंडियाचा भाग होता. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराझ खान इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. त्याने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. पण सर्फराझला अद्याप विदेशात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यादरम्यान त्याची निवड भारताच्या अ कसोटी संघात झाली असून तो इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर आता त्याचे लक्ष आता इंग्लंड लायन्सविरुद्ध दमदार कामगिरी करण्यावर असेल, जेणेकरून तो वरिष्ठ संघाचा भाग देखील बनू शकेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळण्याची अधिक शक्यता आहे. विराट कोहलीच्या जागी तो कसोटी संघात प्लेईंग इलेव्हनचा भाग बनू शकतो.
इंग्लंड दौऱ्यासाठी सर्फराझ खानने वजन कमी केलं आहे आणि तो डाएट देखील फॉलो करत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सर्फराझ खानने फिट राहण्यासाठी उकडलेल्या भाज्या आणि चिकन यांचा कडक डाएट फॉलो करत आहे, ज्यामुळे तो १० किलो वजन कमी करण्यात तो यशस्वी झाला आहे. याशिवाय तो दिवसातून दोनदा सरावही करत आहे. ज्यामध्ये तो आऊटसाईड ऑफ स्टंपचे चेंडू योग्यरितीने खेळण्यावर जास्त भर देत आहे. जे इंग्लंडच्या स्विंग परिस्थितीत यशाची गुरुकिल्ली मानले जाते.
सर्फराझने आतापर्यंत टीम इंडियासाठी ६ कसोटी सामने खेळले आहेत, त्याने हे सर्व सामने फक्त भारतीय भूमीवर खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि ३ अर्धशतकंही झळकावली आहेत. तो टीम इंडियाकडून शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला होता.