scorecardresearch

सरिता देवीची दमदार ‘वापसी’

बंदीची शिक्षा पूर्ण करून बॉक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या भारताच्या एल. सरिता देवीने दमदार ‘वापसी’ केली.

सरिता देवीची दमदार ‘वापसी’
सरिता देवी

शिवा थापा, देवेंद्रो सिंग यांची विजयी सलामी
एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून बॉक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या भारताच्या एल. सरिता देवीने दमदार ‘वापसी’ केली. आशियाई स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या सरिताने चीनमधील किआना येथे सुरू असलेल्या सराव स्पध्रेच्या पहिल्याच सामन्यात ६० किलो वजनी गटात मंगोलियाच्या सोवोडेर्डेनवर ३-० असा विजय मिळवला. या स्पध्रेत सरितासह भारताच्या इतर बॉक्सिंगपटूंनी चीन, मंगोलिया, थायलंड आणि कोरियाच्या खेळाडूंना कडवी टक्कर दिली.
आशियाई स्पध्रेच्या उपांत्य फेरीत वादग्रस्तरीत्या पराभूत घोषित करण्यात आल्यानंतर पदकवितरण सोहळ्यात सरिताने पदकस्वीकारण्यास विरोध दर्शवला आणि त्यामुळे तिच्यावर एका वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
विश्व अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदक जिंकणाऱ्या शिवा थापाने ५६ किलो वजनी गटात थायलंडच्या युट्टापोंग थाँग डीचा ३-० असा, तर राष्ट्रकुल स्पध्रेतील रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रो सिंगने ४९ किलो वजनी गटात चीनच्या यांग युफेंगचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पध्रेतील आणखी एक रौप्यपदकविजेत्या मनदीप जांग्राने (६९ किलो) ३-० अशा फरकाने थायलंडच्या निक फिशरवर विजय मिळवला.
आशियाई स्पध्रेतील रौप्यपदकविजेत्या विकास कृष्णनने (७५ किलो) थायलंडच्याच अफिसीतचा ३-० असा पराभव केला. त्यांच्यासह कुलदीप सिंग (८१ किलो), अम्रितप्रीत सिंग (९१ किलो), नरेंदर (+९१ किलो) यांनीही आगेकूच केली. मात्र गौरव बिधुरी (५२ किला), मनीष कौशिक (६० किलो) आणि राष्ट्रकुल स्पध्रेतील कांस्यपदक विजेती पिंकी जांगरा (५१ किलो) यांना पराभव पत्करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2015 at 00:36 IST

संबंधित बातम्या