भारताचा बॉक्सिंगपटू सतीश कुमारने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पदकासह जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेतील स्थान निश्चित केले. त्याने ९१ किलोवरील वजनी गटात ताजिकिस्तानच्या सियोवुश झुखुरोव्हवर विजय साजरा केला. मात्र, मदन लाल (५२ किलो) व कुलदीप सिंग (८१ किलो) यांना पराभव पत्करावा लागला.
प्रतिस्पर्धी खेळाडूने सलग दोन इशारे मिळूनही नियमांचे उल्लंघन केल्याने सतीशला विजयी घोषित करण्यात आले. गुरुवारच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी उपांत्य फेरीत सतीशसमोर चीनच्या दुसऱ्या मानांकित वांग झिबाओचे आव्हान असेल. मदन आणि कुलदीप यांचे आव्हान संपुष्टात आले असले तरी जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील त्यांच्या आशा अद्यापही कायम आहेत. या दोघांना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करणाऱ्या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यास त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
‘‘पहिल्या फेरीपासून सतीशचे वर्चस्व दिसत होते आणि प्रतिस्पर्धी खेळाडूने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व त्याला सतीशच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यात अपयश येत असल्यामुळे तिसऱ्या बाऊटनंतर सामनाधिकाऱ्यांनी खेळ थांबविला,’’ अशी माहिती प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनी दिली. बुधवारी मदन लालच्या पराभवाने भारताची सुरुवात झाली. मदनला उझबेकिस्तानच्या दुसऱ्या मानांकित शाखोबिदीन जोईरोव्हकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला. कुलदीपला कडव्या संघर्षांनंतरही कोरियाच्या किम हायएगीक्यूने १-२ असे नमवले.
सतीशपूर्वी एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), शिवा थापा (५६ किलो) आणि विकास कृष्णन (७५ किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत जागा पक्की केली आहे.