बॅडमिंटनमधील भारताची आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जागतिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना आपले पदक निश्चित केले. या जोडीचे हे दुसरे जागतिक पदक असेल.
पॅरिस ऑलिम्पिकमधील पराभवाची परतफेड करत सात्त्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या आरोन चिया-सोह वुई यिक जोडीचा ४३ मिनिटांत २१-१२, २१-१९ असा पराभव केला.
‘‘तेच शहर, तेच केंद्र आणि तेच कोर्ट आणि त्याच प्रतिस्पर्ध्यांकडून आम्ही एक वर्षापूर्वी पराभव पत्करला होता. ऑलिम्पिक स्पर्धेतील ते अपयश आज जागतिक स्पर्धेतील विजयाने धुऊन टाकले. आम्ही खूप आनंदी आहोत,’’ असे चिरागने सांगितले.
सात्त्विक-चिराग जोडीने यापूर्वी २०२२ मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी जागतिक पदकापर्यंत पोहोचली आहे. आता या पदकाचा रंग तोच राहणार की बदलणार यासाठी भारतीय चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल. भारतीय जोडीची गाठ आता चीनच्या ११व्या मानांकित चेन बो यांग आणि लियु यी जोडीशी पडणार आहे.
‘‘आम्ही कुठल्याही प्रतिस्पर्ध्यास कमी लेखत नाही. क्षमता आणि कौशल्य असल्यामुळे प्रत्येक जण या क्षणापर्यंत पोहोचत असतो. आम्ही यापूर्वी त्यांच्याशी खेळलो आहोत. आम्हाला या लढतीची प्रतीक्षा असेल,’’ असेही चिराग म्हणाला.
उपांत्यपूर्व फेरीत सुरुवातीपासूनच अचूक फटक्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय जोडीने ‘सर्व्हिस’वरदेखील चांगले गुण मिळविले. सर्वात विशेष बाब म्हणजे प्रदीर्घ रॅलीतदेखील त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर वर्चस्व राखले. या सामन्यातील एक रॅली तर सर्वाधिक ५९ फटक्यांची झाली. भारतीय खेळाडूंनी लय कायम राखण्यासाठी खेळातील आक्रमक धोरण चांगले राबवले आणि याचाच फायदा त्यांना झाला.
‘‘दुसऱ्या गेममध्ये आघाडीवर असतानाही आम्हाला लढत सोपी नसणार असेच वाटत होते. त्यामुळे आम्ही प्रतिस्पर्धी जोडीस छोटीशीदेखील संधी मिळू दिली नाही. लढतीवर नियंत्रण असल्यामुळे गुणांसाठी घाई करणे टाळले. आम्हाला सर्वोत्तम खेळ करायचा होता आणि तो आम्ही केला. या वेळी स्पर्धेत खेळताना आमचे नियोजन वेगळे राहिले. प्रतिस्पर्ध्यापेक्षा आम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करणे. उद्दिष्टापासून ढळणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत,’’ असे सात्त्विकने सांगितले.