जागतिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा
जागतिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम आठ जणांमध्ये धडक मारणारा पहिला भारतीय स्क्वॉशपटू ठरलेल्या सौरव घोषालचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अखेर भंगले. ऐतिहासिक कामगिरीनंतर आत्मविश्वास उंचावलेला सौरव जेतेपदाच्या दिशेने आगेकूच करेल, असे वाटत होते. मात्र उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इजिप्तच्या रॅमी अशोरने सौरवचे आव्हान संपुष्टात आणले. अवघ्या ४८ मिनिटांत अशोरने हा मुकाबला ११-९, ११-५, ११-९ असा जिंकला.
बलाढय़ अशोरला सौरवने जबरदस्त कौशल्यासह टक्कर दिली मात्र अशोरने लौकिलाला साजेसा खेळ करत मुकाबला जिंकला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्याची अशोरची ही सलग चौथी वेळ आहे.
सौरव आणि अशोर यांच्यात याआधी झालेल्या चार लढतींमध्ये अशोरची ४-० अशी निर्विवाद आघाडी होती. या विजयासह अशोरने आपला दबदबा कायम राखला. पहिल्या गेममध्ये सौरवने ८-४ अशी भक्कम आघाडी घेत चांगली सुरुवात केली. त्यानंतरही तो ९-६ अशा स्थितीत होता. मात्र त्यानंतर अशोरने सलग पाच गुण मिळवत पहिला गेम जिंकला.
आक्रमक आणि झंझावाती खेळ करत अशोरने ९-१ अशी एकतर्फी आघाडी घेत दुसरा गेम जिंकला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी सौरवला तिसरा गेम जिंकणे अनिवार्य होते. तिसऱ्या गेममध्ये ९-९ अशी गुणस्थिती होती. सौरव प्रत्येक गुणासाठी अशोरला झुंजवत होता. मात्र यानंतर ठेवणीतल्या फटक्यांसह अशोरने सौरवला निष्प्रभ करत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
‘‘अशोरविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, हा सन्मान आहे. पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये मी चांगला खेळलो. पहिला गेम जिंकू शकलो असतो तर सामन्याचे चित्र बदलले असते. स्पर्धेतील कामगिरीबाबत मी समाधानी आहे,’’ असे सौरवने सांगितले.