Yuzvendra Chahal on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल या मालिकेतून बाहेर आहे. मात्र तरीही सध्या तो चर्चेत आहे. धनश्री वर्माबरोबरचा घटस्फोट, वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणी आणि क्रिकेटमधील न ऐकलेल्या अनेक गोष्टी त्याने राम शमानीबरोबरच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्या आहेत. यावेळी विराट कोहलीबाबत त्याने केलेले एक विधान चर्चेत आहे. ज्यामुळे विराट कोहलीने क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मनाला चटका लावून जाते.
२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकातून भारताला बाहेर पडावे लागले होते. न्यूझीलंडने भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. फक्त क्रिकेट चाहतेच नाही तर भारतीय संघातील खेळाडूंनाही हा पराभव जिव्हारी लागला. संघाचे अनेक खेळाडू भावूक झाले, तर विराट कोहली बाथरुममध्ये रडत होता, असा प्रसंग युजवेंद्र चहलने पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितला.
सदर सामना मँचेस्टरमध्ये खेळला गेला होता. न्यूझीलंडने भारतासमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र २२१ धावांवर भारताचे सर्व फलंदाज बाद झाले. न्यूझीलंडने १८ धावांनी सामना जिंकला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला आणि शेवटचा एकदिवसीय विश्वचषक होता. या पराभवानंतर तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना टीकेचा सामना करावा लागला होता.
राज शमानीच्या फिगरिंग आऊट या पॉडकास्टमध्ये बोलताना चहल भावूक होताना दिसला. त्याने म्हटले, “मँचेस्टरच्या मैदानात मी शेवटचा फलंदाज म्हणून उतरलो होतो. सर्वबाद झाल्यानंतर जेव्हा मी ड्रेसिंग रुमकडे जात होतो, तेव्हा मी विराटच्या डोळ्यात अश्रू पाहिले. प्रत्येक खेळाडू तेव्हा रडत होता. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही.”
सेमी फायनलच्या सामन्या संदर्भात माहिती देताना चहलने म्हटले की, त्या सामन्यात माझी कामगिरी चांगली झाली नव्हती. मी माझ्या १० षटकात ६३ धावा दिल्या होत्या आणि फक्त केन विलियमसनची विकेट घेतली होती. मला वाटते, त्यावेळी मी आणखी चांगले खेळू शकलो असतो.

दरम्यान या मुलाखतीमध्ये चहलने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील फरकावरही चर्चा केली. त्याने सांगितले की, रोहित मैदानात शांत असतो तर विराटचा मैदानावरील प्रत्येक दिवस ऊर्जेने भरलेला असता. प्रत्येकवेळी तो उत्साहात असतो.