scorecardresearch

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचपुढे उपांत्यपूर्व फेरीत अल्कराझचे आव्हान?; विम्बल्डन टेनिस स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर

शुक्रवारी विम्बल्डन टेनिसची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली.

dockovic
सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच

एपी, विम्बल्डन : आगामी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि २२ ग्रँडस्लॅम विजेत्या स्पेनच्या राफेल नदालपुढे पहिल्या फेरीत बिगरमानांकित खेळाडूंचे आव्हान असेल, तर पुनरागमन करणाऱ्या सेरेना विल्यम्सची सलामीची लढत ११३व्या मानांकित हार्मनी टॅनशी होईल. विम्बल्डन टेनिस स्पध्रेची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यानुसार पुरुष एकेरीत जोकोव्हिच पहिल्या फेरीत कोरियाच्या सोनवो क्वोनचा सामना करेल, तर नदालसमोर अर्जेटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुन्डोलोचे आव्हान असेल. जोकोव्हिचने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली, तर तिथे त्याची गाठ पाचव्या मानांकित स्पनेच्या कार्लोझ अल्कराझशी पडू शकते. हा अडथळा त्याने पार केल्यास उपांत्य फेरीत त्याचा सामना तिसऱ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी होऊ शकतो. या फेरीतही त्याने विजय मिळवल्यास अंतिम फेरीत त्याच्यासमोर नदालचे आव्हान असेल.

नदालची लय पाहता त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यास तिथे त्याचा सामना सहाव्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमेशी होऊ शकतो. या फेरीत विजय नोंदवल्यास उपांत्य फेरीत त्याच्यासमोर ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान असू शकते. या स्पर्धेत थेट प्रवेशिकेद्वारे आलेल्या सेरेनाची पहिली लढत फ्रान्सच्या २४ वर्षीय हार्मनी टॅन विरुद्ध रंगणार आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यास स्पेनच्या चौथ्या मानांकित पॉला बाडोसाची गाठ पडू शकते. हा सामना जिंकल्यास सेरेनाला पोलंडच्या अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकचा सामना करावा लागेल. त्यामुळे सेरेनाला २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी चांगली मेहनत करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Schedule wimbledon tennis tournament announced djokovic challenge ysh