वृत्तसंस्था, पॅरिस : पोलंडच्या अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाचे कडवे आव्हान तीन सेटच्या झुंजीत ६-२, ५-७, ६-४ असे परतवून लावत फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गेल्या चार वर्षांत तिसरे विजेतेपद पटकावले. विजेतेपद राखणारी श्वीऑनटेक ही दुसरीच महिला टेनिसपटू ठरली. यापूर्वी २००७ मध्ये जस्टिन हेनिनने अशी कामगिरी केली होती. स्पर्धेत एकही सेट न गमावता अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या श्वीऑनटेकला अंतिम लढतीत मात्र एक सेट गमवावा लागला. श्वीआनटेकचे कारकीर्दीमधील हे चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.
दुसऱ्या मानांकित आरिना सबालेन्काचा पराभव करून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुचोव्हाकडून श्वीऑनटेकला प्रतिकार होणार हे अपेक्षित होते. मात्र, श्वीऑनटेकने दोन वेळा सव्र्हिस भेदताना पहिला सेट सहज जिंकून दमदार सुरुवात केली. विशेष म्हणजे दुसऱ्या सेटलाही दुसऱ्याच गेमला ब्रेकची संधी साधून श्वीऑनटेकने ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, जिगरबाज मुचोव्हाने नंतर सलग तीन गेम जिंकताना प्रथम बरोबरी साधली. पुढे दोन वेळा श्वीऑनटेकची सव्र्हिस भेदत मुचोव्हाने दुसरा सेट जिंकला. दुसऱ्या सेटला मुचोव्हाने दाखवलेली आक्रमकता जबरदस्त होती. मुचोव्हाचे ओव्हरहेडचे फटके श्वीऑनटेकचा कस पहात होते. नेटवर येण्याचे मुचोव्हाचे धाडसही यशस्वी ठरले. तिसऱ्या सेटलाही मुचोव्हाने पहिल्याच सेटला ब्रेकची संधी साधून श्वीऑनटेकसमोर आणखी आव्हान उभे केले. मात्र, अनुभवी श्वीऑनटेकने संयम राखले आणि चौथ्या व दहाव्या गेमला ब्रेकची संधी साधून तिसऱ्या सेटसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.



