Steven Smith Takes Jaw Dropping Catch Of Virat Kohli Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी २८० धावांची आवश्यकता होती. तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ७ विकेट्स घ्यायच्या होत्या. भारताचे दोन सेट फलंदाज विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानावर होते. दोघांनी चौथ्या दिवशीच्या शेवटच्या टप्प्यात चांगली फलंदाजी केली होती.
स्मिथने कोहलीचा घेतला अप्रतिम झेल
विराट कोहली खेळपट्टीवर सेट झाला होता आणि मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, स्टीव्ह स्मिथने स्लिपमध्ये हवेत उडी मारून विराटचा झेल घेतला आणि त्याच्या इनिंगचा शेवट केला. स्कॉट बोलॅंडने ४७ व्या षटकात फेकलेल्या तिसऱ्या चेंडूवर विराटने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागला आणि दुसऱ्या स्लिपच्या उचव्या बाजूला गेला. त्याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी असलेल्या स्मिथने हवेत उडी मारून कोहलीचा झेल घेतला. विराटने ७८ चेंडूत ४९ धावा केल्या.
विराट पाठोपाठ बोलॅंडने जडेजालाही पाठवलं तंबूत
रवींद्र जडेजाने मागील काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळी केली आहे. जडेजा धावा काढण्याच्या बाबतीत प्रमुख फलंदाजांना नेहमीच टक्कर देतो. मात्र या सामन्यात जडेजाला धावा कुटण्यात अपयश आलं. स्कॉट बोलॅंडने विराटला बाद केल्यानंतर त्याच षटकातील दोन चेंडूनंतर जडेजाला झेलबाद केलं. जडेजाने पहिला चेंडू सोडला. परंतु, दुसरा चेंडू ऑफ स्टम्पच्या खूप जवळ होता. चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागून विकेटकीपर अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला. त्यामुळे जडेजाला भोपळाही फोडता आला नाही.