रेड बुलचा विश्वविख्यात चालक सेबॅस्टियन वेटेलने जपान ग्रां.प्रि. स्पर्धेचे रविवारी जेतेपद पटकावले असून, त्याचे हे चालू मोसमातील सलग पाचवे विजेतेपद आहे. यापूर्वी मायकल शुमाकरने २००४ साली पाच सलग जेतेपदे पटकावली होती.
वेटेलने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले असले, तरी सलग चौथ्यांदा ‘फॉम्र्युला-वन’ अजिंक्यपदाचा किताबाचा मानकरी होण्यासाठी त्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. या स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावलेल्या फर्नाडो अलोन्सोशी त्याला कडवी झुंज द्यावी लागेल. गेल्या पाच जपान ग्रां.प्रि. स्पर्धापैकी वेटेलने चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली असून या मोसमातील त्याचे हे नववे जेतेपद आहे.
‘फॉम्र्युला-वन’ किताबाच्या शर्यतीमध्ये वेटेल हा अलोन्सोपेक्षा ९० गुणांनी पुढे असून अजूनही मोसमातील चार स्पर्धा बाकी आहेत. या स्पर्धेच्या ४१व्या टप्प्यामध्ये वेटेलने आघाडी घेतली आणि ती कायम राखत जेतेपद पटकावले. संघ सहकारी मार्क वेबरला वेटेलने यावेळी ७.१ सेकंदांनी मागे टाकले.
माझी स्पर्धेची सुरुवात चांगली झाली नव्हती, पण मी रोमेनला पहिल्यांदा मागे टाकत वेबरलाही पराभूत करण्यात यशस्वी ठरलो आणि स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याचा अनुभव अद्भुत आहे. चाहत्यांचा अप्रतिम पाठिंबा आम्हाला होता आणि त्यांनी आमचा चांगलाच सन्मान केला.
सेबॅस्टियन वेटेल, रेड बुलचा खेळाडू