पहिल्या सामन्यासाठी कोहली अनुपलब्ध

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे सोपवावी, की उपकर्णधार र्अंजक्य रहाणेकडे हा पेच राष्ट्रीय निवड समितीपुढे पडला आहे. कारण नियमित कर्णधार विराट कोहली विश्रांतीच्या उद्देशाने पहिल्या किंवा दोन्ही कसोटी सामन्यांतून माघार घेण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडविरुद्ध १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा केली. परंतु नेतृत्वाच्या पेचप्रसंगामुळे कसोटी संघाची घोषणा लांबणीवर पडली आहे.

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयात नेतृत्वाची चुणूक दाखवणारा रहाणे त्यानंतर मात्र धावांसाठी झगडताना आढळत आहे. डिसेंबर २०२०च्या मेलबर्नमधील शतकानंतर त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही.

नवा प्रशिक्षक राहुल द्रविडशी विचारविनिमय करूनच निवड समिती न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी प्रभारी कर्णधार नेमणार आहे. शुक्रवारी भारतीय कसोटी संघाची घोषणा होण्याची शक्यता असून, कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणे किंवा रोहित यांच्यापैकी एकाकडे नेतृत्व सोपवले जाणार आहे.

गेले सहा महिने अथक क्रिकेट सामन्यांनंतर कर्णधार कोहलीने पहिल्या कसोटीपर्यंत विश्रांतीची विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती. कोहली मुंबईतील दुसऱ्या कसोटीत खेळल्यास रोहितला विश्रांती देण्यात येईल. जेणेकरून त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो ताजातवाना होऊ शकेल.

पंत, बुमरा, शमी, शार्दूलला विश्रांती

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंतसह जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि शार्दू्ल ठाकूर या वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. ते जैवसुरक्षित परिघात सातत्याने खेळत आहेत. पंतच्या जागी वृद्धिमान साहाकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येईल. के. एस. भरतला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात येईल.