Asia Cup 2025 Shaheen Afridi Statement on IND vs PAK: पाकिस्तान संघाने आशिया चषकाच्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशवर शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यातील विजयासह पाकिस्तानचा संघ थेट आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यासह आशिया चषक इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी काय म्हणाला, पाहूया.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फक्त १३५ धावा केल्या. पण बांगलादेशसाठी मात्र हे आव्हान मोठं ठरलं. १३६ धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना, शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात परवेझ हुसेन इमॉनला बाद करून पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर त्याने तौहिद हृदयला बाद करून संघाला दुसरा ब्रेकथ्रू मिळवून दिला.
नंतर हरिस रौफने बांगलादेशला तिसरा धक्का दिला. या खराब सुरुवातीमुळे बांगलादेशचा संघ बॅकफूटवर गेला आणि पुढे कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. बांगलादेशचा निम्मा संघ ६३ धावांमध्येच माघारी गेला होता. सुरुवातीच्या पाच फलंदाजांपैकी एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी, बांगलादेशला २० षटकांत ९ बाद १२९ धावा करता आल्या आणि ११ धावांनी सामना गमावावा लागला.
शाहीन आफ्रिदी या सामन्याचा सामनावीर ठरला. आफ्रिदीने फलंदाजी करताना १३ चेंडूत २ षटकारांसह १९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नंतर गोलंदाजीत त्याने ४ षटकांत १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शाहीन आफ्रिदी म्हणाला, “सर्वात आधी हा पुरस्कार मी माझ्या पत्नीला आणि मुलाला समर्पित करतो. सामन्याच्या सुरूवातीला जितके लवकर ब्रेकथ्रू मिळतात ते महत्त्वाचे असतात. पॉवरप्लेमध्ये त्या ३ षटकांमुळे खूप फरक पडला. मी स्लोअर बॉल टाकण्याचा सराव करत आहे आणि या सामन्यात मोक्याच्या क्षणी अचूक स्लोअर बॉल टाकले गेले. आम्ही लवकर विकेट्स गमावल्यानंतर मला लवकर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय संघाने घेतला. त्या दोन षटकारांमुळे सामन्याचा रोख बदलला आणि आम्ही धावा करायला सुरूवात केली.” भारत पाकिस्तान फायनलबद्दल विचारताच शाहीन म्हणाला, “आम्ही तयार आहोत”
आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तानचे संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. तर आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना होणार आहे.