Shahid Afridi on Mohsin Naqvi: आशिया चषकात भारताकडून तीन वेळा लाजिरवाणा पराभव सहन करावा लागल्यानंतर पाकिस्तानी संघाचे अंतिम सामन्यात हसू झाले. आशिया चषकात विजयी होण्याचे स्वप्न तर धुळीस मिळालेच. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा आणखी डागाळली. भारतीय क्रिकेट संघाने मोहसीन नक्वी यांच्या हस्ते करंडक घेण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीचे तथा एसीसीचे अध्यक्ष करंडक घेऊन मैदानातून पळाले. त्यानंतर आता पाकिस्तानमधूनच नक्वी यांचा विरोध होऊ लागला आहे.
पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने नक्वी यांच्यावर टीका करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आशिया चषकात जो काही गोंधळ झाला, त्यानंतर आफ्रिदीने ही मागणी केली आहे. मोहसीन नक्वी हे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असण्याबरोबरच राजकारणी आणि पाकिस्तानचे मंत्री आहेत. क्रिकेटकडे पूर्णवेळ लक्ष देणाऱ्या व्यक्तीची या पदावर निवड करण्यात यावी, असेही आफ्रिदीने सुचवले आहे.
मोहसीन नक्वी यांच्याकडे अनेक पदे असल्याबाबत आफ्रिदीने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर नक्वी यांनी पूर्ण वेळ पीसीबीचे काम पाहावे, असे आफ्रिदीने सुचविले होते. आता आशिया कपमध्येही गोंधळ झाल्यानंतर आफ्रिदीने आपली मागणी पुन्हा रेटली आहे. पाकिस्तान क्रिकेटशी निगडित विषय सोडविण्यात ते अपयशी ठरले असल्याचे आफ्रिदीने म्हटले आहे.
मोहसीन नक्वींना क्रिकेटचे ज्ञान नाही
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानला टी२० विश्वचषक जिंकून दिलेला आहे. पाकिस्तानचा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मोहसीन नक्वी यांना क्रिकेटचे फार कमी ज्ञान असल्याचे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. तसेच नक्वी यांच्या आजूबाजूला अतिशय सुमार सल्लागारांची गर्दी आहे, असाही टोला आफ्रिदीने लगावला.
शाहीद आफ्रिदी म्हणाला की, नक्वी यांच्याकडे दोन अतिशय महत्त्वाची पदे आहेत. दोन्हीही कामे मोठी आहेत. त्यांना त्या त्या कामासाठी पूर्ण वेळ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना माझी विनंती किंवा सल्ला असेल की त्यांनी एक पद सोडावे. पीसीबीचे अध्यक्षपद हे गृहमंत्रालयापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे ते वेगळेच ठेवले पाहिजे. कोणताही विलंब न करता हा निर्णय घेतला गेला पाहिजे.
नक्वींनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत
आशिया कपमध्ये मोहसीन नक्वी यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शाहिद आफ्रिदीने केलेली टिका धाडसी मानली जात आहे. भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर त्या विषयाचे विनाकारण राजकारण केल्याचा आरोप नक्वीवर ठेवण्यात आला होता. एवढेच नाही तर पाकिस्तानने आशिया चषकातून बाहेर पडण्याचीही धमकी दिली होती. या नाट्यामुळे युएई विरोधात खेळला जाणारा सामना एक तास उशीरा सुरू झाला होता.
याशिवाय भारत-पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यानंतर नक्वी यांनी सोशल मीडियावरून एक आक्षेपार्ह पोस्ट करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. वाद उद्भवल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीटही केली होती. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती.