Pakistan Cricket Team Head Coach Vacancy : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) सध्या पाकिस्तान संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे, ज्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनशी संपर्क साधला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानी संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर, पीसीबीने संपूर्ण प्रशिक्षक कर्मचारी बदलले होते, ज्यामध्ये त्यांनी मोहम्मद हाफिजला संघाचे नवे संचालक बनवले होते आणि मुख्य प्रशिक्षकाची अतिरिक्त जबाबदारी दिली होती.

मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पराभवानंतर मोहम्मद हाफिजने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघाला मायदेशात न्यूझीलंड आणि त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. पीसीबीला याआधी मुख्य प्रशिक्षकाची जागा भरायची आहे. शेन वॉटसनबद्दल बोलायचे तर, तो सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली क्वेटा ग्लॅडिएटर्स ५ वर्षांत प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरला आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पीसीबी वॉटसनला मुख्य प्रशिक्षकापदासाठी एकमेव पर्याय मानत नाही. कारण तो ही ऑफर स्वीकारेल की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. पीएसएल व्यतिरिक्त, वॉटसन सध्या मेजर लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे, याशिवाय तो आयपीएल आणि आयसीसी इव्हेंटमध्ये कॉमेंट्रीच्या भूमिकेतही दिसतो.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : मुंबई पहिल्या डावात २२४ धावांत गारद, शार्दुल ठाकुरचे अर्धशतक, हर्ष-यशचे प्रत्येकी तीन बळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीसीबीचा मुख्य प्रशिक्षकासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु –

पीसीबीचे नवे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, बोर्ड सध्या विविध पर्यायांवर विचार करत आहे आणि आम्ही संघासाठी सर्वोत्तम प्रशिक्षक नियुक्त करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. वॉटसन व्यतिरिक्त, पीसीबी वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीच्या संपर्कात आहे, जो सध्या वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-२० संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.