भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे न्यायालयात गेल्यामुळे राजकीय चर्चेत आलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीवर बाळ म्हाडदळकर गटाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. गुरुवारी रात्रीच एमसीएच्या अध्यक्षपदावर केंद्रीय मंत्री शरद पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले होते. उर्वरित १६ जागांपैकी १२ जागांवर म्हाडदळकर गटाचे उमेदवार निवडून आले. याचप्रमाणे या वर्षी नव्याने स्थापन झालेल्या ‘क्रिकेट फर्स्ट’चे चार उमेदवार निवडून आले; तथापि प्रा. रत्नाकर शेट्टी यांच्या गटातील नऊही उमेदवारांचे पानिपत झाले.
उपाध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीमध्ये विजय पाटील आणि रवी सावंत यांनी बाजी मारली. त्यांना अनुक्रमे १९० आणि १५९ मते मिळाली, तर १४६ मते वाटय़ाला आलेल्या पंकज ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला. कोषाध्यक्षपदाच्या एका जागेवर अपेक्षेप्रमाणेच विनोद देशपांडे (१६२) आणि मयांक खांडवाला (१५३) यांच्यात लढत रंगली; परंतु देशपांडे यांनी फक्त नऊ मतांनी खांडवाला यांच्यावर मात केली. संयुक्त सचिवपदाच्या दोन जागांवर अपेक्षेप्रमाणेच नितीन दलाल (१६९) आणि पी. व्ही. शेट्टी (२०३) यांनी आपले पद राखले. पराभूत उमेदवार उन्मेश खानविलकर यांच्या खात्यावर १४३ मते होती, तर प्रवीण बर्वे यांच्या खात्यावर अवघ्या ४९ मतांचा समावेश होता.
कार्यकारिणीत अन्य ११ जागांवर म्हाडदळकर गटाच्या दीपक पाटील, अरविंद कदम, श्रीकांत तिगडी, संजय पाटील, रमेश वाजगे, दीपक मुरकर, नवीन शेट्टी आणि अरमान मलिक यांनी स्थान मिळवले, तर ‘क्रिकेट फस्र्ट’कडून भारताचे माजी क्रिकेटपटू अ‍ॅबी कुरुविल्ला, लालचंद रजपूत आणि नदीम मेमन यांनी स्थान मिळवले. एमसीएच्या ३२९ सदस्यांपैकी ३१८ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारपासून विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.

एमसीएची नवीन कार्यकारिणी समिती
अध्यक्ष                    शरद पवार
उपाध्यक्ष                रवी सावंत, विजय पाटील
कोषाध्यक्ष                 विनोद देशपांडे
संयुक्त सचिव                पी.व्ही. शेट्टी, नितीन दलाल
कार्यकारिणी सदस्य              दीपक पाटील, अरविंद कदम, श्रीकांत तिगडी, संजय पाटील, रमेश वाजगे, दीपक मूरकर, वीन शेट्टी, अरमान मलिक, अ‍ॅबी                     कुरुविल्ला, लालचंद राजपूत, नदीम मेमन