Shardul Thakur, India vs India A: हेडिंग्लेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. भारत आणि भारतीय अ संघांदरम्यान इंट्रा स्क्वॉड सराव सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय अ संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करून मुख्य संघातील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांची धुलाई करत दमदार शतकी खेळी केली.
इंग्लंड दौऱ्यासाठी रविंद्र जडेजासह शार्दुल ठाकूर, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी या तिघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता या शर्यतीत शार्दुल ठाकूरने मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असणाऱ्या शार्दुल ठाकूरने फलंदाजीत दमदार शतकी खेळी केली. या डावात त्याने १२२ धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. या कामगिरीसह त्याने हेडिंग्लेमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी दावा केला आहे.
जर शार्दुल ठाकूरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार असेल, तर नितीश कुमार रेड्डीला आपल्या संधीची वाट पाहावी लागेल. यासह वॉशिंग्टन सुंदरला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे.
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. तर रविंद्र जडेजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. त्याला साथ देण्यासाठी शार्दुल ठाकूरचा देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो. शार्दुल ठाकूर गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतो. त्याच्याकडे नवीन आणि जूना चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. यासह तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन धावांमध्ये भर घालून देऊ शकतो. याशिवाय त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे. हे पाहता, त्याचं संघातील स्थान जवळजवळ निश्चित झालं आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव</p>